पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परिवाराचे हितचिंतक म्हणून सर्वश्रुत असले तरी शेतकरी संघ, मुख्याध्यापक संघ सारखे अनेक संघ एकत्रित आणण्याचे त्यांचे कसब लक्षात घेऊनच त्यांचा ‘तो’ लौकिक पसरलेला दिसतो. एकेकाळी मुख्याध्यापक संघात ब्राह्मण मुख्याध्यापक बरेच असायचे. त्याच काळात तो संघ एकसंध होता. त्यांच्या एकसंधतेचे रहस्य बापूसाहेबांच्या सायंकाळच्या आश्रयासच दिले जायचे. बापूसाहेबांनी सिद्धिविनायक, राधेश्याम प्रभृतींच्या साक्षीने ही सारी लीला घडवून आणल्याचे आम्ही ऐकून आहोत.

 बापूसाहेब अनेक संस्थांचेही आश्रयदाते आहेत. त्यांनी कमावले भरपूर व भरभरून संस्थांना दिले. ते अनेक संस्थांच्या भोजनावळीचा ठेका घेतात. त्यात ब-याचदा पदरमोडही होत असते; पण ती पदरमोड हा त्यांच्या आनंदाचा भाग असतो. आमच्या बालकल्याण संकुलात होणा-या प्रत्येक अनाथ मुलामुलीच्या लग्नादिवशी येतील तेवढ्यांना मिष्टान्न देणारे बापूसाहेब, इतकं सारं करून नामानिराळे राहतात. स्थितप्रज्ञता, निरीच्छता त्यांच्याकडून शिकावी. परवा आमच्या मुलीचं लग्न होतं. संस्थेतील कर्मचा-यांनी कामाला हात लावला तर दोनशे रुपये काढून देणारे बापूसाहेब प्रत्येकाच्या कष्टांचे देणे देणारे तत्पर व्यावसायिकच सिद्ध होत नाही, तर आपण ज्या कष्टातून आलो त्याची जाणीव या सा-यांतून आपल्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. ते गांधी, मार्क्स कधी नमूद करीत नाहीत; तर काटेकोरपणे अमलात आणतात. बापूसाहेब अनेक संस्थांचे आश्रयदाते तसेच व्यक्तींचेही, माणसाच्या पडत्या काळात हात देणाच्या बापूसाहेबांचा हात कुणाला दिसून येणार नाही. स्वातंत्र्यानंतर ज्या काही व्यक्तींनी भूमिगत कार्य केलं त्यांत बापूसाहेब अग्रणी ठरावेत. अनेक राजकीय नेत्यांच्या निवडणुकांच्या भोजनावळी बापूसाहेबांनी घातल्या. ब-याचदा माणसं निवडून इतकी मोठी झाली की, इतक्या मोठ्या माणसाकडे पैसे मागायचे कसे म्हणून बुडीत व पडला-हरला तर जाऊ दे म्हणून सोडलेलेही बुडीत. दुहेरी बूड सोसून तरणारा हा खवैय्या दुस-यांना तारत राहतो तेव्हा लक्षात येते की, या माणसात एक वेगळेच रसायन भरलेले आहे. त्यांचं औपचारिक शिक्षण फारसं झालं नाही; पण अनौपचारिक शिक्षणाचे ते द्रोणाचार्यच. त्यांच्या तालमीत अनेक शिष्य तयार झाल्याचे मी ऐकून आहे; पण त्यांची परमार्थता मला फार कमी लोकांत दिसते. त्यांची पारमार्थिकता सतत वाढत राहो व त्यांचा वरदहस्त नित्य वंचितांच्या विकासास लाभो, हीच मंगलमहोत्सव प्रसंगी कामना. 'इदं न मम'च्या निरपेक्षतेने जी माणसे नित्य प्रतिदिन समाजासाठी सतत करीत राहतात, समाज खरं तर त्यांच्यामुळेच मंगलमय होत असतो.

माझे सांगाती/९२