पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 यात सुनीलचं जगणंच प्रतिबिंबित झालेलं. सुनील कोण नव्हता? मित्र, लेखक, कवी, कलाकार, जाहिरातदार, भूमिगत समाजसेवी, अभिनेता, संघटक, योजक, कॉपी रायटर, संगीताचा दर्दी, समाजनिरीक्षक, गैरतेचा विरोधक, सगुण उपासक, सुंदर पत्रलेखक, व्याख्याता, प्रशिक्षक, कुटुंबवत्सल, सहनशील व्यावसायिक, गुणग्राहक, समाजहितैषी... कोण नव्हता तो! म्हणून त्याच्या जाण्यानं सर्वक्षेत्री, सर्वथरी हळहळ होती. तसा तो कोणी पदाधिकारी, पुढारी नव्हता; पण त्याच्यातलं माणूसपण मात्र पक्क होतं. कोल्हापूरशी त्याचं अद्वैत होतं. इथल्या मातीशी त्यानं आपली नाळ जोडली होती. क्लब, संस्था, संघटना, पत्रे, पुढारी, साच्यांशी त्याचं जमायचं नि खटकायचं; पण खटका त्यानं कधी उडू दिला नाही. असा तो समंजस होता खरा!
 कोल्हापूर संवेदनशीलांचं सरोवर. सुनील या सरोवरातील कमळ शोभावा असा. त्याच्या गुलाबी मनाच्या पाकळ्या, गुणग्राहकतेचा पराग, सर्वांना कवटाळणारी त्याची लांब देठं... न दिसणाच्या परंतु सतत वळवळत राहणा-या संवेदनशीलतेच्या मुळ्या या सरोवरात सर्वत्र पसरलेल्या होत्या. म्हणूनच की काय तो कोणीही नसताना त्याच्या अपघाती निधनानंतर माणसांचं मोहोळ सुरू होतं. स्वत:ला विसर्जित करू शकणारा माणूसच सर्वांचा होऊ शकतो ना? असं होणं मात्र दुर्मीळ असतं खरं!
 सुनीलची नि माझी पहिली भेट ‘आंतरभारती'तील. मी त्या काळात वरच्या वर्गात शिकवायचो. एकदा ऑफ तासाला म्हणून आरवाडेंच्या बिल्डिंगमध्ये भरणाच्या पाचवीच्या वर्गावर गेलो असता तो मला पहिल्यांदा भेटला. पहिल्या बाकावर उभारून मुलांना गप्प करणारा सुनील. हातात फूटपट्टी पट्टी की तो मोठा असा भ्रम व्हावा इतकाच निष्पाप, निरागस सुनील!
 परत त्याची भेट झाली ती बहुधा कोरगावकर हायस्कूलला. तेव्हा शाहूपुरीतून आठवीच्या मुलांची आयात केली होती. त्यातून तो आला असावा. पण मला तो आठवतो तो एस. एस. सी.तला सुनील, सुंदर अक्षरांत गृहपाठ लिहिणारा. नियमित प्रश्नोत्तरांत पटाईत. निबंधातील त्याचं लालित्य मला त्या वेळीही हरवायचं नि आजही.

 मग मी सुनीलला आठवतो तो डॉ. आठल्यांच्या हॉस्पिटलमधला. ऐन एस. एस. सी. परीक्षेत त्याचं ऑपरेशन झालेलं. परीक्षेला बसणारच म्हणून त्यानं हट्ट धरलेला. मी वर्गशिक्षक होतो त्याचा. वडील उजडायच्या आधी घरी काळजीत डुंबलेले. सुनीलला समजावा म्हणून माझ्याकडे आलेले. तसाच गेलो मी... समजावलं. त्यानं ऐकलं. वडिलांचा जीव भांड्यात पडला. बाहेर

माझे सांगाती/९४