पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वाश्रयी दाता : बापूराव जोशी

 माणसाच्या एकमेकांच्या परिचयाच्या अनेक छटा असतात. उभं आयुष्य एकत्र घालवूनही एकमेकांना न ओळखू शकलेली माणसं जशी असतात तशी एकमेकांना फारसं न भेटता चांगलं ओळखणारीसुद्धा असतात. मी बापूसाहेब जोशींना फारसं भेटलो नाही. त्यांचा माझा प्रत्यक्ष परिचय अगदी अलीकडचा. वर्षा दोन वर्षांचा; पण मी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना ओळखतो. त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं. प्रत्यक्ष परिचयात ऐकल्यापेक्षा अधिक उजवे दिसले मला बापूसाहेब. मध्यंतरी आम्ही 'महाराष्ट्र राज्य वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केलं होतं. राज्यभरातील सुमारे शंभर अनाथाश्रम, निरीक्षणगृहांतील सुमारे २०० 0 अनाथ, निराधार मुलांना घरचा आनंद, आतिथ्य देण्याच्या उद्देशाने योजलेल्या या सोहळ्यात आम्ही ‘अन्नपूर्णेचा शोध घेत होतो नि या शोधात आम्हाला बापूसाहेब हाती लागले.
 माणसं पोट भरायला येतात आणि नशीब काढतात. बापूसाहेबांच्या बाबतीत हे तंतोतंत पटतं. गांधीहत्येनंतर ज्या अनेक ब्राह्मण कुटुंबांची वाताहत झाली, त्यांपैकी एक कुटुंब बापूसाहेबांचंही होतं. ब्राह्मण कुटुंबात बापूसाहेब जन्मले तरी भिक्षुकीची लाचारी त्यांना कधी शिवली नाही. कष्टाने त्यांनी आपली मीठ-भाकरी कमावली ती दुस-याला श्रीखंड पुरी खिलवून. दुस-यांना भरविणाच्या बापूसाहेबांनी भरपूर कमावलं ते इमाने इतबारे. त्यांच्याशी बोलण्यात,


माझे सांगाती/९०