पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या बोलण्यातूनही ही निखळता स्पष्ट होते. ते व्यवहार ठरविताना चक्क सांगतात की, मला यातून इतके मिळणार आहेत. ही सचोटी, स्पष्टता, पारदर्शिता व्यवहारात फारच कमी व्यावसायिकांत दिसते.
 बापूसाहेबांकडे जेवणाचा बेत सोपविण्यात गि-हाइकाचा फार मोठा फायदाच असतो. कोणताही बेत त्यांच्यावर सोपवावा आणि माणसांनी निश्चिंत राहावं. (खरं तर झोपावं) हरघडी धक्के देणाच्या या युगात एखादा व्यावसायिक भरवशाचा सापडणं ही काही कमी भाग्याची गोष्ट नाही. मी अनेक कुटुंबं अशी पाहिलीत की, आजोबांच्या श्राद्धापासून ते नातवाच्या बारशापर्यंतच घरात कुठलंही कार्य असो; त्यात बापूसाहेब हे गृहीत असतात. लग्न, मुंज, बारसं, डोहाळे, ओटीभरणं, साखरपुडा, एकसष्ठी, अमृतमहोत्सव... समारंभ कोणताही असो; लोक बापूसाहेबांना गृहीत धरून आखतात. त्यातच त्यांच्या व्यावसायिक तत्परतेची, विश्वासार्हतेची पोहोचपावती असते.
 कोल्हापूर क्षत्रिय पीठ, इथे एखाद्या ब्राह्मणाने पाय रोवणे सहज शक्य होते असे मी म्हणणार नाही. बापूसाहेब इथे स्थिरावले त्यामागे त्यांचे कष्टसातत्यच लक्षात येते. येथील क्षत्रिय (मी मराठे मुद्दामच म्हणत नाही!) मंडळींना मांसाहाराची चटक ज्या अनेक बल्लवांनी लावली, त्यांत बापूसाहेबांचा सिंहाचा वाटा लक्षात येतो. लहानपणी ब्राह्मणांना बाटविल्याच्या अनेक सुरस कथा ऐकल्या-वाचल्या होत्या. या ब्राह्मणाने मात्र अनेक क्षत्रियांना नुसते बाटवलेच नाही, तर मांसाहाराच्या नादी लावले असे म्हटले तर ते अतिशयोक्त न व्हावे! अनेक क्षत्रिय, सरंजामी, शहाण्णव कुळी मराठमोळ्या मावळ्यांना बापूसाहेब नामक ब्राह्मणाच्या हातातंच मटण का लागतं ते एकदा खाल्ल्याशिवाय कळणार नाही. जन्माला यावे परि कोल्हापुरी एकदा मटण खावे, अशी मनीषा बाळगून शिवशाहीतील अनेक वतनदार करवीरनिवासिनी आई जगदंबेच्या आशीर्वादास येतात, त्यामागे एक प्रेरणा बापूसाहेबांच्या हातचं खाण्याचीपण असते हे मी ऐकून आहे. बापूसाहेब ओल्या पाट्र्या करतात की नाही ते मला माहीत नाही. त्यांचे मटणही मला माहीत नाही. (आपला पंथ चुकल्याचं दुःख झोकांड्या खात हात मारणा-यांना, बापूसाहेबांच्या मांडवात पाहताना मला नेहमी होत असतं!)

 बापूसाहेब हे लोकसंग्रही गृहस्थ, त्यांच्या लोकसंग्रहात गोळवलकर ते गोबेल्स सर्व विचारवर्गाचे अनुयायी तुम्हास भेटतील. एकाच पक्षातील परस्परविरुद्ध शड्डू ठोकणारे, दोन भिन्न दिशांना तोंड असणारे प्रतिस्पर्धी एकत्र येऊन गळ्यात गळा घालतानाचे मनोरम दृश्य तुम्हास पाहायचे असेल तर मांडव मात्र बापूसाहेबांचा असेल तरच ते शक्य होईल. बापूसाहेब संघ

माझे सांगाती/९१