पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पब्लिक अंकल : मुक्तेश्वर मुनशेट्टीवार

 मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांचा आणि माझा परिचय गेल्या पंधराएक वर्षांचा. महाराष्ट्रातील अनाथ, निराधार, बालगुन्हेगारांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अनाथाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था चालविल्या जातात. या संस्थांची एक मध्यवर्ती संस्था आहे. महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटना तिचे नाव. या संस्थेवर प्रत्येक जिल्हा संस्थेचा प्रतिनिधी येत असतो. मी कोल्हापूरहून यायचो. मुक्तेश्वर नाशिकहून. इतर प्रतिनिधींपेक्षा मुक्तेश्वरांमध्ये असलेल्या संवेदनेच्या अधिकच्या डिग्रीमुळे मी त्यांच्याकडे आकर्षिला गेलो. त्यांचे व्यक्तिमत्त्व इतर प्रतिनिधींपेक्षा वेगळे होते. त्यांच्याकडे लक्ष जाण्याचे ते एक कारण होतेच. दाढी, खादीचा झब्बा, विजार, खांद्यावर शबनम नि भरलेलं अंग. वृत्तीनं शांत, समंजस. इतर प्रतिनिधी सभेत गळा काढून आपण अनाथांचे खरे कैवारी म्हणून आपलं धादांत खोटं रूप खरं करून दाखवत असताना मुक्तेश्वर निमूटपणे निरखत राहायचे. बहुधा त्यांच्या मनात मंडळींच्या छद्मीपणाचा पंचनामा चालत असायचा, हे त्यांच्या बोलक्या चेह-यावरून व चेह-यावरील दाढी सारणाच्या त्यांच्या अंगविक्षेपानी लक्षात येत राहायचं. मी त्या काळात संस्थेचा उपाध्यक्ष, समाजसेवा त्रैमासिकाचा संपादक म्हणून कार्यरत होतो. उपाध्यक्ष असलो तरी सक्रिय कार्यकर्ता म्हणून सर्व प्रतिनिधींशी माझा निकटचा संवाद असायचा, तसा तो मुक्तेश्वरांचाही.


माझे सांगाती/८६