पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मुक्तेश्वर सभागृहात, सभेत औपचारिक फार कमी बोलायचे. त्यांचं सारं व्यक्तिमत्त्व नि कार्य याला घट्ट अशी अनौपचारिक बैठक, अधिष्ठान आहे नि असायचं. सभा संपली की यायचे. मोकळेपणानं बोलायचे. अनाथ, निराधार, मुलांचे प्रश्न मांडायचे. त्यात मूलभूत विचार असायचे. मुलांबद्दल अकृत्रिम आस्था असायची. माझा पवित्रा शासनाच्या कोडगेपणाविरुद्ध नेहमी आक्रमक असायचा. सभेस राज्यस्तरीय उच्चाधिकारी असायचे. मी प्रस्ताव, ठराव मांडले की मुक्तेश्वर उठायचे. समर्थन, अनुमोदनात्मक बोलायचे. त्यांच्या बोलण्यात तुला निर्णायक करायची तुळशीपत्राची शक्ती असायची. ती शक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आपसूक यायची. ती सहज असायची. तिच्यात आत्मबल असायचं; कारण ती अनाथ, निराधार बालकांबद्दल असलेल्या असाधारण, अकृत्रिम लोभातून आलेली असायची.
 मुक्तेश्वर बैठकी, सभा, कधी-कधी संघटनांच्या कामानिमित्त कोल्हापूरला आले की अवश्य यायचे, भेटायचे, बोलायचे. विविध संस्थांना भेटी द्यायचा त्यांचा उपक्रम असायचा. यात एक गुणग्राहकता असायची. सर्व संस्थांतील चांगलं हेरायचं नि आपल्या संस्थेत ते रुजवायचं. त्यांचा हा स्वभाव मला माझ्या नाशिक दौ-यात लक्षात आला. नाशिकच्या माझ्या अनेक दौ-यांत मी त्यांचे कार्य, साम्राज्य आणि मनुष्यसंग्रह अनुभवला.
 त्यांचं रिमांड होम पाहिलं. त्या वेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ते रिमांड होममध्ये ग्रंथालय सुरू करायच्या धडपडीत होते. रिमांड होमचं बंदिस्तपण त्यांना अस्वस्थ करीत रहायचं. रिमांड होम ‘मुक्तांगण' व्हावं असा त्यांचा प्रयत्न असायचा. महाराष्ट्रातील ज्या निवडक संस्थांनी मुलींचे रिमांड होम सुरू करण्याचा, व्यावसायिक उपक्रम चालविण्याचा दूरदर्शीपणा दाखविला होता, त्यांत मुक्तेश्वरांचं नाशिकचं रिमांड होम होतं. मध्यंतरी अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे, सीमा, प्रभृतींनी महाराष्ट्रातील तेरा बालकांची हत्या केल्याचं प्रकरण नाशिकमध्ये उघडकीला आलं. आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची मुलं नाशिकच्या रिमांड होममध्ये होती. आरोपी आता कोल्हापूरच्या कारागृहात आल्या नि त्यांनी आपली मुलं आपणाकडे असावीत, अशी मागणी केली. त्या वेळी मुक्तेश्वरांनी प्रयत्न करून ती मुलं आमच्या ताब्यात दिली. बंदी असो की बालगुन्हेगार; त्यांचे जीवन परंपरेच्या जोखडातून मुक्त व्हावं असं वाटणारे मुनशेट्टीवार हे केवळ नावाचे मुक्तेश्वर नव्हेत. हे नाव त्यांनी आपल्या कार्य नि संवेदनशीलतेतून सार्थ केलं होतं.



माझे सांगाती/८७