पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सन १९९६ मध्ये आमच्या 'वात्सल्य बालसदन'ला दहा वर्षे पूर्ण झाली. दशकपूर्तीचा आम्ही एक छोटेखानी कार्यक्रम केला. हे सदन सुरू करायला साहाय्य करणा-यांना आम्ही आवर्जून बोलावलं होतं. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुसुमताई वाळंजकर, डॉ. विजय करंडे, अॅड. आडगुळे अशी घरचीच मंडळी पाहणे होती. अॅड. आडगुळे संस्थेत कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी येतात. छोटे-मोठे साहाय्य करतात. त्यांच्या साच्या कृतीतून सहजतेत व्यक्त होणारा सद्भावाचा दरवळ मी नेहमी हुंगत आलो आहे.
 माझे एक विद्यार्थी प्रा. बाबासाहेब पोवार त्या वेळी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कनिष्ठ शाखेकडे काम करायचे. वरिष्ठ शाखेत हिंदी अधिव्याख्यातापद रिक्त झालेले. नियमानुसार झालेली निवड काही मंडळी मानेनात. अॅड. आडगुळेचे प्रा.पोवार निकटचे मित्र. केवळ साप म्हणून भुई धोपटायला निघालेल्या मंडळींना अॅड. आडगुळे यांनी जनमतांच्या रेट्याने दिलेले उत्तर हे त्यांच्या वचनबद्धतेचे आणखी एक उदाहरण म्हणून सांगता येईल.
 माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड, ‘सत्यवादी'कार बाळासाहेब पाटील यांच्या राजकीय व सामाजिक संस्कारांत त्यांचा पिंड पोसला. ते सतत एक कार्यकर्ता हिंतचिंतक म्हणून या दोघांच्या मागे उभे राहिले. 'सत्यवादी'कारांनी आपल्या उभारीच्या काळात कोल्हापूरचं समाजमन बदललं नि घडवलं. त्यांचं स्मारक कोल्हापुरात व्हावं म्हणून महावीर उद्यानात उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे अॅड. आडगुळे यांनी आपल्या सामाजिक संस्काराच्या नंदादीपाचं केलेलं अक्षय पूजनच! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं मोठं रामायण घडलं. मुळात हा पुतळा रंकाळा चौपाटीवर उभारण्यात यावयाचा होता. त्याला विरोध झाल्यावर त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर उभारून विरोधकांना दिलेली विधायक चपराक करवीरवासीय जनता कधीच विसरू शकणार नाही. छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्यास व्हीनस चौकासारखी जागा मिळवून देण्यात अॅड. आडगुळे यांनी मोठी धडपड केली. नगरसेवक' या पदाची प्रतिष्ठा रोज लोप पावत असताना त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेली आपली प्रतिमा ही अनेकांना प्रेरक वाटत आली आहे.

 अॅड. आडगुळे म्हणजे माणसांचं मोहळ मागे लागलेलं एक कुशल व्यक्तिमत्त्व. आपल्या अवघ्या पंचावन्न वर्षांच्या आयुष्यात ते महाराष्ट्र नि गोव्याच्या बार कौन्सिलचे अध्यक्ष झाले. यामागे कार्याची परंपरा जशी आहे तशी त्यांची अजातशत्रू मैत्रीवृत्तीही कारणीभूत आहे. ते एक कुशल नियोजक

माझे सांगाती/८४