पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शासनाच्या दृष्टीने हा धोरणात्मक निर्णयाचा भाग होता व त्याचा फायदा राज्यभरच्या नगरपरिषदांना होणार होता. त्या वेळी जिल्हाधिकारी अ. कृ. नंदकुमार व महापौर अॅड. आडगुळे होते. श्री. नंदकुमार काही काळ प्रभारी आयुक्तही होते. दोघांनी मनावर घेतले. त्यात मन:पूर्वक पाठपुरावा अॅड. आडगुळे यांनी केला.
 राज्याच्या नगरविकास सचिवांना या निर्णयामागील हेतू अॅड. आडगुळे यांनी समजावून सांगितला व शासनास निर्णय घेण्यास भाग पाडले. आपल्या महापौरपदाच्या कार्यकालात आमच्या संस्थेस वाढीव अर्थसाहाय्य देता यावे म्हणून त्यांनी केलेली धडपड आजही माझ्या चांगली लक्षात आहे. १९८६ च्या नोव्हेंबरमध्ये ‘बालदिनाचे औचित्य साधून आम्ही 'वात्सल्य बालसदन' सुरू केले. तत्कालीन जिल्हाधिकारी अ. कृ. नंदकुमार समारंभाचे प्रमुख पाहुणे, तर अॅड. आडगुळे अध्यक्ष असा तो कार्यक्रम होता. या कार्यक्रमात आडगुळे यांनी महापालिकेचे एक लाखाचे अनुदान तर दिलेच; पण त्यात आणखी आपल्या नगरसेवक निधीतून एक हजाराची भर घातली. असा हा शब्दप्रामाण्यवादी कार्यकर्ता. या साच्या प्रयत्नात ‘हे मी केलं!' असा कुठे अहंभाव नाही की आविर्भाव. त्यांच्या या निष्काम कर्मवादी वृत्तीमुळे मला त्यांच्याबद्दल नेहमीच आपुलकी वाटत आली आहे.

 मध्यंतरी मी न्यायालयात गेलेलो. संस्था अनाथ मुलांचं दत्तकीकरणाद्वारे पुनर्वसन कार्य करते. त्या संदर्भात मला एक प्रतिज्ञापत्र सादर करायचं होतं. मी न्यायालयाच्या आवारात नोटरीच्या शोधात भिरभिरत असल्याचं अॅड. आडगुळे यांनी पाहिलं नि बोलावलं. 'मी आहे की नोटरी!' म्हणत काम विचारलं. वाचून सही-शिक्का तर केलाच; पण त्यासाठी लागणारी तिकिटंही लावली. मी पैसे द्यायला लागल्यावर ते त्यांनी नम्रपणे नाकारले. “आपलंच काम आहे' म्हणणाच्या अॅड. आडगुळेना कार्यकर्त्यांच्या कामाचं मोलही असतं हे समजलं. पुढे असेच एकदा संस्थेच्या मुलास आम्ही घर मिळवून दिलं. त्यांचे कायदेशीर सोपस्कार त्यांनी सहजपणे करून दिले. फी विचारली तर सांगायला तयार नाहीत. आमच्या मुलास मी बळेने फी द्यायला लावली तर ती घेतानाची त्यांची नाराजी आजही माझ्या चांगली लक्षात आहे. गेल्या वीस वर्षांच्या बालकल्याण संकुलाच्या कामात आम्हाला अनेक वकील मित्रांनी मोलाची साथ दिली. व्यक्तिगत जीवनात पावतीच्या तिकिटाची वसुली करणारे वकील जेव्हा मी पाहतो, तेव्हा अॅड. आडगुळे यांच्यासारखं आभाळाएवढं मोठं मन असणाच्या या साहाय्यकर्त्यांचे वेगळेपण लक्षात येतं!

माझे सांगाती/८३