पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राजनैतिक विधिज्ञ : अॅड. महादेवराव आडगुळे

 व्यापार, व्यवहारामध्ये सर्वाधिक महत्त्व जर कशाचे असेल तर दिलेला शब्द पाळण्याचे. आपल्या दैनंदिन व्यवहाराची सारी मदार असते शब्दांवर. रोजच्या व्यवहारात आपण सारे काही पोहोचपावती घेऊन करीत नसतो. विश्वास हीच आपल्या साच्या सामाजिक व्यवहाराची कसोटी आहे. सामाजिक नि राजकीय जीवन सतत अविश्वासाच्या ढगांनी झाकल्याचा पदोपदी येणारा अनुभव हेच सांगतो. अशा परिस्थितीत दिलेला शब्द पाळणारा, दिलेल्या वचनाला जागणारा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून अॅड. आडगुळे यांचे कार्य व कर्तृत्व अधिक मोलाचे वाटते. शब्दप्रामाण्यवादी, तळमळीचा एक निगर्वी कार्यकर्ता म्हणून मला त्यांच्याबद्दल नेहमीच आदर वाटत आलेला आहे.

 सन १९८५ च्या सुमाराची गोष्ट. ते कोल्हापूर महापालिकेत दुस-यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे महापौरही झाले. याच काळात त्यांचा नि माझा कार्यकर्ता म्हणून संबंध आला. मी ‘रिमांड होम'चे ‘बालकुमार संकुल करण्याचा ध्यास घेतला होता. सतत नवनव्या योजना आम्ही आखीत होतो. कोल्हापूर महापालिकेने नगरपालिका असताना वार्षिक एक हजार रुपयांचे अनुदान वार्षिक पंचवीस हजार केले तरी आमच्या गरजा भागत नव्हत्या. अॅड. आडगूळे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महापालिकेने संस्थेस एक लाख रुपयांचे वार्षिक सहाय्य करण्याचे ठरविले; पण नियमानुसार एका संस्थेस पंचवीस हजार रुपयेच देता यायचे. शासन निर्णय बदलायची गरज होती.

माझे सांगाती/८२