पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनिल मेहतांनी मग मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना कोल्हापूरचं मार्केट महत्त्वाकांक्षेपुढे ठेंगणं वाटू लागलं. आनंद यादव यांचे मित्र, त्यांना अनिलभाईंनी पुस्तकाची गळ घातली. आनंद यादवांनी अट घातली, 'तुम्ही पुण्यात प्रकाशन सुरू कराल तर मी पुस्तक देईन.' कारण त्या वेळी पुणे ही मराठी प्रकाशनाची राजधानी होती. त्यांचं ‘गोतावळा' गाजत होतं. आनंद यादवांनी 'माळावरची मैना' कादंबरी अनिलभाईंना दिली आणि अजब प्रकाशनाचं रूपांतर होऊन ‘मेहता पब्लिशिंग हाऊस'ची मुहूर्तमेढ रोवली गेली. सन १९९० चं साहित्य अकादमीचे पारितोषिक डॉ. यादवांच्या 'झोंबी' ला मिळालं आणि मेहता पब्लिशिंग हाऊसला राष्ट्रीय प्रतिष्ठा लाभली.
 तो काळ मराठी साहित्यिकांच्या दृष्टीने प्रकाशकांच्या मर्जीनुसार हप्त्याहप्त्याने रॉयल्टी घेण्याचा होता. ती हजारात मिळणं मोठी गोष्ट होती. अशा काळात सन १९९८ मध्ये विश्वास पाटील यांना त्यांच्या ‘महानायक कादंबरीसाठी १० लाख रुपये देऊन डोळे आणि उखळ एकाच वेळी पांढरे करणारे अजब प्रकाशकही अनिल मेहताच; अगदी अलीकडे त्यांनी द. मा. मिरासदारांची सर्व पुस्तके प्रकाशित केली. संचरूपात त्याची रॉयल्टी पोहोचल्यावर ‘द. मां.'चा अनिलभाईंना फोन, ‘तुमचा रॉयल्टीचा हिशेब चुकलाय का ते परत एकदा तपासून पहा. इतकी मोठी रॉयल्टीची रक्कम मी स्वप्नातही पाहिली नाही. खर्च केली तर ऋण काढूनही परत करू शकणार नाही!' असा अनुकरणीय वस्तुपाठ निर्माण करणारे अनिल मेहता.

 मराठी साहित्यविश्वात त्यांनी अनेक छोट्या-छोट्या गोष्टी रुजवत आपली अजब प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांनी पुस्तक प्रकाशनाचे देखणे कार्यक्रम सुरू केले. या कार्यक्रमांना प्रवेशपत्रिका असत. कार्यक्रम वेळेत सुरू होतं व वेळेत संपत. श्रोत्यांची वानवा असलेल्या वर्तमानात त्यांचे कार्यक्रम कायम हाऊसफुल्ल राहिलेत. त्यांनी रणजित देसाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार सुरू केला. त्यात अन्य प्रकाशकांच्या पुस्तकांचा, साहित्यिकांचा गौरव करण्याची उदारवादी परंपरा निर्माण केली. 'मेहता ग्रंथ जगत'सारखे ‘हाऊस मॅगेझीन घरोघरी पोहोचविले. ‘टी बुक क्लब' सुरू करून वाचनालयावर जगणाच्या मराठी वाचकांना पुस्तके विकत घेऊन वाचण्याची सवय लावली, संस्कारित केले. जागतिक कीर्तीची पुस्तके, त्यांचे मराठी भाषांतराचे हक्क विकत घेऊन भाषांतरित पुस्तक वाचन संस्कृती निर्माण केली. मराठी वाचकांचे वाचन प्रगल्भ व अभिजात झाले. फ्रेंकफुर्टमध्ये (जर्मनी) संपन्न होणा-या जागतिक

माझे सांगाती/७३