पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हायला हवा, असं शेठ धोंडीलाल मेहतांना वाटायचं. नाव शेठ असलं तरी घरी खायची भ्रांत होती; पण पोरगं शिकलं तरच दिवस बदलतील म्हणून त्यांनी अनिलला पुण्याला शिकायला ठेवलं. ‘सायन्स'साठी म्हणून फर्गुसन कॉलेजला घातलं. तिथं याचं मन रमेना ते वाचनवेडामुळे. मग ते बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये दाखल झाले नि बी. कॉम. झाले. निपाणीत व्यापार चालणार नाही, हे ओळखून अनिल मेहता यांनी कोल्हापूरला कूच केली. देवचंद शहांचं साहाय्य नि आशीर्वाद लाभले नि ते कोल्हापूरला स्थिरावले. भवानी मंडप, अंबाबाईचे देऊळ, शिवाजी पुतळा, गुजरी, जुन्या राजाराम कॉलेजचा परिसर म्हणजे कोल्हापूरचं हृदय. तिथे ‘अजब पुस्तकालय' सुरू झालं ते वर्ष होतं १९६४-६५.
 पहिली पाच वर्षे त्यांनी पुस्तक विक्रेता म्हणून मोठी मेहनत घेतली. आलेल्या वाचकाला मागेल ते पुस्तक मिळवून द्यायचा रिवाज त्यांनी पाळला. त्यातून वाचकांचं मोहोळ त्यांच्या दुकानात सतत घोंघावत राहायचं. सन १९७० ला त्यांना प्रकाशक होण्याचे वेध लागले. याचंही एक कारण होतं. तोवर अजब पुस्तकालय म्हणजे साहित्यिकांचे ‘अजायब घर' झालेलं होतं. मला आठवतं, मी पदवीधर होत होतो. तरुणपणी प्राध्यापक लेखकांचं मोठं आकर्षण असायचं. आनंद यादव, बॅरिस्टर पी. जी. पाटील, प्राचार्य भा. शं. भणगे, शंकर पाटील, रणजित देसाई यांना मी पहिल्यांदा पाहिलं ते अजब पुस्तकालयातच. हे दुकान एव्हाना वाचक, साहित्यिकांचा अड्डा होऊन गेला होता.

 अशा दिवसांत बापू गावडे नामक पट्टीच्या वाचकांनी अनिलभाईंना गप्पांच्या ओघात एक किस्सा ऐकविला. अनिलभाईंनी त्याला तो लिहायला लावला. त्याची कादंबरी झाली. दस-याचं सोनं' म्हणून ती प्रसिद्ध झाली. साधा हॉटेल चालविणारा हा पैलवान गडी गल्ल्यावर बसून नित्य पुस्तकात गढलेला असायचा. 'दस-याचं सोनं' जिल्हा परिषदेनं लुटलं. अख्खी आवृत्ती खरेदी केली. अनिलभाईंना फंडा मिळाला. त्यांनी डॉ. आनंद यादव, प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. शरद वराडकर, अनंत तिबिले, बाबा कदम, शंकर पाटील यांना हाताशी धरून वाचकप्रिय पुस्तके प्रकाशित करण्याचा धडाका लावला. स्वतः चोखंदळ वाचक असल्याने मासिकांत पाळत ठेवून लेखक पकडायचे. पुढे मग इंग्रजी भाषांतराला हात घातला. 'फ्रीडम अॅट मिडनाइट मराठीत आणलं. त्यानं चांगलाच हात दिला.

माझे सांगाती/७२