पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


घडवून आणणारा प्रकाशक अनिल मेहता. मराठी पुस्तकविक्री म्हणजे उधार बाजार नि वायदे. कितीही खेटे घाला, ‘देंगे दिलायेंगे'ची भाषा. ही बिकट वाट रोखीचा धंदा सुरू करून सुखकर केली ती अनिल मेहतांनी. 'वेटलेस प्रिंटिंग सुरू करून मराठी पुस्तकांचं दर्जेदार उत्पादन सुरू करणारा प्रकाशक तो हाच. किती गोष्टी सांगू? सन १९६४ ला नुकतंच मिसरूड फुटलेला एक तरुण निपाणीचे वडिलार्जित कटलरीचं दुकान सोडून कोल्हापूरला ‘अजब पुस्तकालय सुरू करतो. पन्नास वर्षांत जागतिक कीर्तीचा प्रकाशक बनतो, हे मराठीचे अजब वैभवच नव्हे का?
 असं अजब कर्तृत्व सिद्ध करणारे मराठीतील प्रथितयश प्रकाशक अनिल मेहतांचा आज पंचाहत्तरावा वाढदिवस. ते आपल्या आयुष्याचा ‘अमृत महोत्सव साजरा करीत असताना योगायोगाने त्यांच्या प्रकाशनास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या प्रकाशनाच्या स्थापनेचा ‘सुवर्णमहोत्सव साजरा होत आहे. या दुग्धशर्करा योगाचं कौतुक कुणा मराठी वाचक, लेखक, विक्रेते, भाषांतरकार, मुद्रक, संपादकांना वाटणार नाही? त्यांना जीवेत शरदः शतम्' म्हणून शुभचिंतन करणं हा रिवाज झाला. खरं तर हा त्यांच्या कर्तृत्वाच्या कौतुकाचा दिवस व त्यांनी दिलेल्या मराठी साहित्यिक योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा क्षण!

 शहा, व्होरा, गांधी, मेहता, जैन ही नावं मराठी जनतेस सराफ कट्टयावर वाचायची सवय. मेहता नावाचा माणूस तोही निपाणीसारख्या तंबाखूच्या राष्ट्रीय पेठेत स्टेशनरी दुकान चालवितो ही स्वातंत्र्यपूर्व काळात अविश्वसनीय वाटणारी गोष्ट. तशी ही घटना अजबच होती की धोंडीलाल वालचंद मेहतांनी अनेक व्यवसाय करीत शेवटी ते पुस्तक विक्रीवर स्थिरावले. तत्पूर्वी पूर्वजांचा सावकारीचा व्यवसाय. तो कालौघात बंद पडणं स्वाभाविक होतं. मग ते कापड विक्री, कागद विक्री, कटलरी विक्री, स्टेशनर्स होत ते पुस्तकं विकू लागले; कारण त्यांना वाचनाची आवड होती. दुस-या महायुद्धाच्या काळात धंद्यास मंदी आल्यावर या गृहस्थांनी आपल्या घरातली अख्खी लायब्ररी वाचून फस्त केली. घरचा वाचनसंस्कार ३ मार्च, १९४१ रोजी जन्मलेल्या अनिलला वारसा म्हणून मिळाला. लहानपणापासून कागद जमवायचा छंद जडला. रंगीबेरंगी कागदाचं बालपणी विलक्षण आकर्षण. मोठेपणी तरुण वयात त्याचे रूपांतर वाचनात झालं. मारवाड्याचा मुलगा पुण्यात कॉलेज शिकतो हे निपाणीकरांच्या दृष्टीने अजब गोष्ट होती; पण ‘अजब स्टोअर्स'चा तो मालक ‘अजब'च

माझे सांगाती/७१