पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेण्यास उत्सुक नव्हते. व्यस्तता हे त्यांचं कारण होतं. डॉ. जयसिंगराव पवार हे तसे अत्यंत शिस्तीचे गृहस्थ होत. घरी त्यांचा दरारा असला तरी घरातील सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याचा शिरस्ता ते पाळत आलेत. त्यांचा हा शिरस्ता पाहून मला नेहमी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आयझेन हॉवर यांची आठवण होते. ते रविवारी दुपारच्या वेळी सर्व कुटुंबीयांसह भोजन घेत. एक कागदी टोपी सर्वांच्या डोक्यावर असे. सर्व समान असल्याचे ते प्रतीक. त्यांचा नातू पण मग मिस्टर हॉवर म्हणत त्यांना प्रश्न करायचा. तीच खानदानी समानता डॉ. जयसिंगराव पवार घरी पाळत आलेत. मी व विशेषतः कॉम्रेड पानसरे यांनी आम्हास आत्ताच तुमचा होकार हवा आहे' म्हटल्यावर ते घरच्यांशी बोलले. कन्या डॉ. अरूंधतीशी फोनवर बोलले. मग होकार दिला... तो पण अनिच्छेने व आमच्या आग्रहापोटी. मला ते सतत पुटपुटत, सांगत होते, ‘मला भाषण करायला जमणार नाही, दगदग जमणार नाही, तुम्ही काय ते सारं पाहायचं?' या साच्यात मर्यादा, जाणिवेपेक्षा जो आपला प्रांत नाही तिथे जा कशाला अशी निरीच्छता होती. ती मला अधिक महत्त्वाची वाटते. सामाजिक जीवनात हे भान महत्त्वाचं असतं, ते डॉ. जयसिंगराव पवार सतत जपत आलेत. त्या दिवशी कॉम्रेड पानसरे यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांना जिल्हाधिका-यांना फोन करायला लावून या प्रश्नावर पडदा टाकला. त्या वेळची डॉ. जयसिंगराव पवार यांची तगमग आजही जशीच्या तशी माझ्या लक्षात आहे.
 मग आम्ही उभयतांनी मिळून दोन वर्षे तरी एकदिलाने कार्य केले. त्या कार्यातही मी अनुभवले की, आपल्या मोठेपणाचा बडेजाव नाही. पुढे करणे नाही. सामर्थ्य व क्षमता असून माणसाचं तटस्थ, त्रयस्थ राहणं यात एक प्रकारची उपजत सुसंस्कृतता असते. ती जयसिंगरावांमध्ये मी कितीतरी प्रसंगांत जवळून अनुभवली आहे. मोठमोठ्या समारंभांत सामान्य म्हणून मिळेल तिथे, कुणाच्याही बरोबर बसणारे डॉ. जयसिंगराव पवार मी अनुभवले आहेत. पहिल्या पंक्तीचा सरंजामी आग्रह त्यांनी कधी धरला नाही व अपेक्षिलाही नाही, हे त्यांचं मोठेपण त्यांना अजातशत्रूपण बहाल करीत आलं आहे. ते त्यांनी आपल्या वृत्तीने जपले, जोपासले आहे. आपल्या मस्तीत ते आनंदी व समाधानी असतात.

 मी बालकल्याण संकुलाचे काम सन २००० च्या दरम्यान सोडायचे ठरविले त्या वेळी अस्वस्थ होणा-यांत डॉ. जयसिंगराव पवार एक होते. याचं कारण आमचे एक समान मित्र असतानाही सामाजिक कामातून चांगली माणसं जाऊ नयेत अशी त्यांची व्यक्त होणारी तळमळ त्यांना ते कळवळ्याच्या

माझे सांगाती/६६