पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जातकुळीचे असल्याचे सिद्ध करीत होती. त्यांच्या पत्नीचा स्वभावही असाच लाघवी व समाजशील असल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे. आतिथ्यआग्रह शिकावा या उभयतांकडून. मंजूश्री डॉक्टरेट झाल्यावर त्यांनी घरी पारिवारिक स्नेहभोजन योजिले होते, ते मी कधीच विसरू शकणार नाही. पारिवारिक अनेक प्रश्नांत त्यांचा माझ्याशी होणारा संवाद हा नेहमीच आत्मीयता व्यक्त नि वृद्धिंगत करणारा राहिला आहे.
 राजर्षी शाहूकार्य म्हणजे त्यांचे जीवनसंचित. हिंदीतील प्रख्यात कथाकार संजीव एक-दोनदा काही कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला आले होते. पैकी एकदोनदा तर मीच त्यांना आग्रहाने आमंत्रित केले होते. या सहवासात संपर्कात राजर्षी शाहंवर हिंदीत कादंबरी लिहिण्याचे घोळू लागले. त्यानिमित्तानेही ते परत कोल्हापुरात आले होते. त्या वेळी संजीव जिज्ञासू असल्याने अनेक नाजूक प्रश्न विचारीत असत. डॉ. जयसिंगराव पवार शाहुभक्त असल्याने त्यांचे अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. राजर्षीच्या प्रतिमेला, चरित्राला धक्का लागू नये म्हणून डॉ. पवार सचिंत असायचे. मीही असायचो. जेम्स लेन प्रकरणाचा धडा आमच्यासमोर होताच. आम्ही त्यांना परोपरीने समजावत राहायचो. त्यांच्या शंकांचं समाधान करीत प्रतिमाभंग होऊ नये अशी काळजी घ्या म्हणून सांगत राहायचो. यातूनही डॉ. जयसिंगराव पवार इतिहासातील सत्याचा अपलाप होऊ नये म्हणून घेत असलेली काळजी लक्षात घेण्यासारखी असायची.

 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन, कार्य आणि विचार यांना समर्पित व्यक्तिमहत्त्व म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांचे कार्य मी सांगावे अशातला भाग नाही. त्या कार्याने त्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता लाभली आहे. ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' हा त्याचा ढळढळीत पुरावा. सरांची ‘संशोधक म्हणून जी मूस तयार झाली तिचे शिल्पकार प्रसिद्ध इतिहासप्रेमी व तज्ज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार होत. ते कुलगुरू असण्याच्या काळातच त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या इतिहासकालीन कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली होती. शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्याच्या काळात जयसिंगराव राजाराम महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होते. डॉ. अप्पासाहेब पवारांचे कुलगुरू असूनही ‘राजाराम कॉलेजच्या इतिहास विभागात जाणे-येणे राहायचे. त्या काळात त्यांनी जयसिंगरावांमधील सव्यसाची इतिहासकार न्याहाळला, जोखला. ते एम. ए. होताच त्यांनी जयसिंगराव पवार यांना आपल्या इतिहास विभागातील मराठा इतिहास संशोधन प्रकल्प'मध्ये संशोधन सहाय्यक म्हणून आमंत्रित केले. त्यामुळे एका

माझे सांगाती/६७