पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


हिंदीबरोबरीने वसंतरावांनी केलेले तेलुगू अनुवाद हा अजून माझ्यासाठी तरी आश्चर्याचा विषय बनून राहिला आहे. बहुधा ते तमिळ, तेलगू संगमाजवळ राहणं हे त्याचं कारण असावं; ‘त्याने जग जिंकले’, ‘अखेरचे झोपडे’, ‘मातीमाय' या त्यांच्या तीनही अनुवादित कादंब-या. कथेचा अनुवाद हा खुष्कीचा मार्ग असतो; तर कादंबरी अनुवाद म्हणजे वाईवरून साताव्याला जाणं असतं. वसंतरावांचा आवाका, आवेश नेहमीच शड्डू ठोकायचा राहिल्याने ते सतत लेखन, अनुवादात शिवधनुष्य उचलण्याचा पराक्रम करीत आले. त्यातूनही त्यांची फुशारकी व वेगळेपण लक्षात येतं.
 संपादन, सहलेखन, निबंधलेखनातूनही वसंतरावांचा साहित्यिक व्यासंग स्पष्ट होतो. यशवंतराव चव्हाणांवरचं त्यांचं संपादन, ‘यशवंतराव : विचार आणि व्यवहार त्यांच्या बहुजनप्रेमाची साक्ष व अभिमानाचं प्रतीक! मनोहारी ललित गद्य हा वसंतरावांच्या लेखणीचा खरा दागिना। ‘कंदिलाचा उजेड' ज्यांनी पाहिला, अनुभवला, वाचला असेल त्यांना मी असे का म्हणतो ते कळेल, त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्यनिर्मिती पुरस्कार' लाभल्याचं आठवतं.
 हिंदीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून त्यांचा विद्याथ्र्यांत लौकिक होता. ‘रयत' मधल्या बदलीच्या त्रासाचा त्रागा असला तरी तो रोजच्या शिकविण्यात त्यांना कधी उतरू दिला नाही. त्यांचं शिकवणं अभ्यासपूर्ण असायचं. शिकविण्यात वाचनाचे दृष्टान्त देत ते अध्यापन उंचवायचे, असे त्यांचे विद्यार्थी सांगताना मी ऐकलं आहे. वर्गात विद्याथ्र्यांशी वागणं ‘शठं प्रति शाठ्यम्' असायचं. कोणी टर उडवायचा प्रयत्न केला तर ते त्यांची टोपी उडवायला कमी करत नसत. शिकविताना येणा-या विवेचनात एक बेरकीपणा असायचा. ती त्यांच्या चिंतनाची खरं तर इतिश्री असायची. मराठी-हिंदी अशा उभयभाषी वाचनलेखनामुळे ते मराठी, हिंदी जगतात समानपणे प्रसिद्ध आहेत. रयत संस्कृती त्यांना मानवणारी नव्हती; पण समझोता म्हणून ती त्यांनी स्वीकारली होती. त्यात रोज होणारी घालमेल, तगमगीने ते कातावून जायचे; पण आडनाव पाटील असले तरी हा गडी मनानं, वृत्तीनं, टिपिकल मध्यमवर्गीयच! ‘तुका म्हणे उगी रहावे' असं म्हणत जगणारे वसंतराव आतून मात्र सतत खदखदत, खेकसत असायचे.

 वसंतराव नि माझ्या मैत्रीतील समान दुवा म्हणजे हरिवंशराय बच्चन. बच्चन यांच्याबद्दल मी अनेकदा लिहिलंय. 'मधुशाला'ला पन्नास वर्षे झाल्यावर मी लिहिलं. “दशद्वार से सोपान'ला ‘सरस्वती पुरस्कार मिळाल्यावर मी लिहिलं. परत एकदा त्यांच्या चारही आत्मकथांबद्दल प्राध्यापक मित्रांसमोर

माझे सांगाती/५५