पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोलून दीर्घ लेख संशोधनपर लिहिल्याचं, प्रकाशित झाल्याचं आठवतं. वसंतराव वाचून दाद द्यायचे. त्यांची टीकाटिप्पणी मार्मिक असायची. 'मधुशाला'वर लिहिल्यावर त्यांचा फोन आल्याचं आठवतं. “आत्ता समजलं तुमचं नाव सुनील का आहे? ते मुळात कृष्णाचं नाव; पण तुमच्या नुसत्या नावात कृष्ण नाही... मना, तनातही भरलेला कृष्ण ‘मधुशाला'च्या निमित्तानं बाहेर आला... यालाच इंग्रजीत ‘कॅथारसिस' की काय म्हणतात ना हो? आम्ही काही डॉक्टर नाही; पण मास्तर मात्र आहोत... या बोलण्यात तुम्ही असाल डॉक्टर, मी ‘मास्टर' असल्याचा अभिनिवेश म्हणजे अस्सल वसंतीय तानेची फेक! असे रसिक वसंतराव म्हणजे हाती न लागणारं व्यक्तिमत्त्व!

 मी कधी कधी विचार करायचो... वसंतराव आपल्याबद्दल माघारी काय म्हणत असतील? अशी जिज्ञासा असायचं एकमेव कारण म्हणजे माणसाचं नीरक्षीर व न्यायविवेकी मूल्यांकन करण्याची वसंतरावांची हातोटी! ती नेहमी न्यायाच्या तराजूसारखी समतोल असायची. त्यांच्या बोलण्यात कधी दीड दांडीचा तराजू मी अनुभवला नाही. याचं कारण या माणसाचं आतून-बाहेरून एक असणं! वसंतराव आत्ममग्न, आत्मरत तसेच आत्मदंग जीवन जगत आले. त्यांना आपल्या साहित्याबद्दल कुणी लिहावं, बोलावं असं नित्य वाटत राहतं, याचं कारण त्यांचं जगणं, लिहिणं मनस्वी जगावेगळं म्हणून उठून दिसणारं! आपणाला जग काय म्हणतं याचा कानोसा घेत त्यांचा महाराष्ट्रभर संचार, पत्रमैत्री, भेटीलागी जीव, सारं सारं माणूस मोहोळ! पण ही गांधीलमाशी ज्याला डसायची त्याची पत्रास नाही उरायची. पण त्यात पाप नसायचे. हिंदीत ज्याला ‘बेलौस’ अभिव्यक्ती म्हणतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसंतराव! माझ्या या मित्राचा साहित्यिक सुवर्णमहोत्सव म्हणजे शब्दसोन्याचा पिंपळ व्हायचा योग! माझ्या या मित्राकडून भविष्यात अधिक उमदं लेखन, जगणं घडावं अशी अपेक्षा! त्यासह शुभेच्छा!

माझे सांगाती/५६