पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/55

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


प्यायचा... वसंतरावांच्या व्यक्तिगत जीवनात अनेक घात, प्रतिघात, अपघात झाले. ते उसवले, पण उद्ध्वस्त नाही झाले; कारण जगण्यावर, वाचनावर, विचारांवर त्यांची अतूट, अढळ, श्रद्धा आहे. त्यांचं हे नशेतलं जगणं आत्मिक असतं. अंतरिक असतं... द्रवरूप नशा प्रासंगिक बहाणा! नशेत जगणा-याला अशा नशा केवळ विरंगुळा असतो.
 वसंत केशव पाटील यांचं स्फुटलेखन मी वृत्तपत्र, नियतकालिकांतून वाचायचो. कथा, कविता, ललितबंध असं ते लेखन असायचं. त्यात लेखकाचं निरीक्षण व ते व्यक्त करण्याची नजाकत यांत एक खोच असायची. या पाटलातलं टगेपण त्यातून व्यक्त होत राहायचं. 'सकाळ'च्या अंकात त्यांची वाचलेली कुस्ती माझ्या अजून स्मरणात आहे. कारण त्यातील ग्रामीण बाज, कुस्तीतील बारकावे व लेखकाची शाब्दिक कलाबाजी. ती विषयाशी समाधी साधणारी असायची. त्यांच्या कविता दुखया कोप-याची कळ व्यक्त करणा-या पण ललित-मधुर असायच्या. साठोत्तरी मराठी लेखनात त्यांचं नाव एक उमदा लेखक म्हणून घेतलं जायचं. त्यांचं समग्र व अखंड वाचलेलं पहिलं पुस्तक ‘छप्पर' कथासंग्रह तो. वसंतरावांनी मोठ्या प्रेमानं बक्षीस दिलेला व मैत्रीच्या नात्यानं त्यांनी मला त्याचं परीक्षण, समीक्षा करण्याचा आदेश दिलेला; पण त्या काळात तो वाचून, आवडूनही मला उसंत नसल्यानं वसंत रुसलेला होता असं आठवतं. 'खुलता कळी खुलेना' असं होऊन गेलं होतं; पण तो राग लटका होता हे मी ओळखून होतो.

 वसंत केशव पाटील यांनी हिंदी कवी बच्चनांच्या आत्मकथेच्या चौथ्या खंडाचा ‘दशद्वार से सोपान'चा अनुवाद मधे मी वाचला! तो बच्चन यांच्यावर काही लिहिण्याच्या निमित्ताने; आणि लक्षात आलं की, हा गृहस्थ लेखनकामाठीतही कुशल आहे. सुमारे पाचशे पानी पुस्तकाचा अनुवाद करणं काही खायचं काम नाही. मी अनेक अनुवाद केले असल्याने अनुवाद कष्ट आणि अनुवादाचा ताण मला माहीत आहे. बच्चन यांच्या समग्र आत्मकथांबद्दलही मी लिहिलं तेव्हा वसंतरावांचा हा अनुवाद परत अभ्यासला होता. अनुवादक म्हणून वसंतरावांनी घेतलेले कष्ट व अनुवादाचे उजवेपण त्यातील कवितांच्या अनुवादावरून स्पष्ट होत होतं. वसंतरावांनी अनुवादासाठी बच्चन यांची आत्मकथा निवडावी यामागंही त्यांचं काव्य, कवी आणि कारुण्य हेच कारण! त्याला श्रेष्ठ अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार, हा पुरस्कार सुरू झाल्याच्या प्रारंभिक काळात मिळाल्यानेही वसंतरावांच्या अनुवादश्रेष्ठतेवर मोहर उठली होती. तेव्हा मोहरलेले, गहिवरलेले वसंतराव हत्तीसारखे झुलतानाही मी पाहिलेत.

माझे सांगाती/५४