पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवसाक्षरांचा नंदादीप : बाबूराव शिरसाट

 बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांचा आणि माझा परिचय झाला, त्याचा दुवा साहित्यच होता, असं मला आठवत असताना लक्षात येतं. 'बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूरच्या स्थापनेपासूनच मी त्या संस्थेशी जोडलेला आहे. रा. वा. शेवडे गुरुजी यांच्या धडपड़ी व पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली. तिला बाळसं देण्यात ज्या अनेक बाल साहित्यकारांचं योगदान आहे, त्यांत सर्वश्री. वसंतराव निगवेकर, त्यांचे बंधू मुकुंदराव निगवेकर, माझे शिक्षक शशिकांत महाडेश्वर, मित्र श्याम कुरळे, गोविंद गोडबोले, श्रीमती रजनी हिरळीकर, विद्यार्थीनी नीलम माणगावे अशी अनेक नावे सांगता येतील. बाबूराव शिरसाट यांचे नाव याच पंक्तीत घ्यावे लागेल. त्यांचा नि माझा विशेष परिचय झाला तो गोविंद गोडबोले यांच्यामुळे; पण मैत्रीस दृढता लाभली, तिचा पैस विस्तारत गेला याचं श्रेय मात्र बाबूराव शिरसाट यांच्या उपजत मनुष्यसंग्रही वृत्तीस आणि त्यांच्या समाजहितैषी कळवळ्या अवलियास द्यावे लागेल.

 जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यास विविध पदांवर बाबूराव कार्य करीत राहिले खरे; पण त्यांचा पिंड म्हणाल तर सामाजिक कार्यकर्त्यांचा. त्यांचं शिक्षण हे खरं तर त्यांना शिक्षक करू इच्छिणारं. म्हणजे ते हिंदीत एम. ए. असल्याने भाषा व साहित्याची त्यांची अभिरुची लेखन-वाचनास पूरक ठरली. ते बी. एड्. झाल्याने त्यांना शिकवायचा ओनामा माहीत होता. त्यांनी आरोग्यशिक्षणाची पदविका कलकत्त्यातून (आत्ताचे कोलकत्ता) संपादन केली.

माझे सांगाती/३९