पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचा उपयोग त्यांना रोजच्या नोकरीत झाला. नोकरी! तीपण शासकीय. सरकारी नोकरी म्हणजे पाट्या टाकायचा उद्योग, असा सर्वसाधारण समज; पण बाबूरावांनी तो आपल्या समर्पित सेवेने चुकीचा ठरविला. आपल्यातील लेखनकौशल्याचा वापर करून त्यांनी आरोग्यशिक्षण समृद्ध करणारं लेखन केलं. ‘आरोग्याच्या नव्या घोषणा’, ‘एक कळी उमलताना', ‘गोष्टीतून आरोग्य शिक्षण'सारखी पुस्तके त्यांनी मला मागे कधीतरी मोठ्या प्रेमानं भेट म्हणून दिली होती. ती वाचताना या माणसाची आरोग्याची जाण आणि जाणीव प्रकर्षाने लक्षात आली होती. त्यांचे ‘गोष्टीतून आरोग्यशिक्षण' पुस्तक आरोग्य साक्षरता वाढविणारे ठरले. बाबूराव शिरसाट यांचं लेखन विविध वय नि स्तरांत विभागलेल्या नवसाक्षरांसाठी होत राहिलं आहे. बालक व प्रौढ साक्षर हे त्यांच्या लेखनाचे लक्ष्यगट होत.
 बालसाहित्याच्या क्षेत्रातील त्यांच्या लेखनाचा प्रारंभ वृत्तपत्रीय लेखनाने झाला. दैनिक पुढारी, सकाळच्या ‘बाल जगत' सदरात त्यांच्या कथा, कविता, बडबडगीते प्रकाशित होत राहिली. पुढे त्यांचीच व अन्य लेखनाची पुस्तके झाली. ‘संस्कार कथा', 'संस्कार गाणी' अशा शीर्षकांतूनच त्यांच्या लेखनाचे प्रयोजन स्पष्ट होते. मध्ये ‘बडबडगीते' नावाचं बालकवितांचं पुस्तक माझ्या हाती आलं होतं. बालगीतांचा मी लेखनासाठी म्हणून धांडोळा घेत होतो, तर त्या प्रातिनिधिक कवितासंग्रहात बाबूराव शिरसाटांच्या एक-दोन नव्हे तर चक्क पन्नास कविता आढळल्याचे मला आठवते. त्यांच्या बालकविता मी अधे-मधे केव्हातरी शिळोपा म्हणून वाचल्या होत्या, तेव्हा असं लक्षात आलं की बाबूरावांचं ‘इसापनीती', 'पंचतंत्र' चक्क काव्यातून प्रकटलं होतं. ही त्यांची शैली त्यांना प्रतिभावान कवी ठरविण्यास पुरेशी आहे. सह्याद्री' या दूरदर्शन वाहिनीच्या सुरुवातीच्या दिवसांत आयोजित कविसंमेलनात बाबूराव शिरसाटांची छबी व आवाज पाहिल्या-ऐकल्याचेही आठवते. दरदर्शनप्रमाणेच बाबूराव आकाशवाणीवरही आधे-मधे हजेरी लावत असतात. आकाशवाणीवरून ‘अवतीभोवती' असा एक कार्यक्रम सादर व्हायचा; त्यात बाबूराव शिरसाटांचं संवादलेखन असायचं. ते ऐकताना या माणसाचं समाजनिरीक्षण सुक्ष्म असल्याचं जाणवायचं. शहाणा गाव' हे त्यांचं प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेलं पुस्तक त्यांना समाजशिक्षक सिद्ध करतं. ‘बिचारे झाड' लिहन बाबूरावांनी पर्यावरणीय साक्षरता विस्तारण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे दिसते.

 या नि अशा अनेक धडपडींतून लक्षात येतं की, बाबूराव शिरसाट यांच्यामध्ये एक चळवळ्या, कळकळ्या कार्यकत्र्यांचं अस्वस्थपण सतत बेचैन असतं. त्यातून ते कधी साहित्य रचतात, तर कधी समाजोपयोगी उपक्रम

माझे सांगाती/४०