पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पत्नी प्रा. कांचनताई कापसे यांनाच द्यावे लागेल. एक तर मी व्यवसाय करीत राहिलो. त्यांनी नोकरी केली. त्या राजाराम महाविद्यालयातून एम. एस्सी. (बॉटनी) झाल्या अन् तिथेच नंतर प्राध्यापिका. अशीच मलाही संधी माझ्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करण्याची मिळाली. त्यांची नोकरी ११ ते ५ अन् माझ्या व्यवसायाचीही तीच वेळ. मुले शाळेतून लवकर घरी आल्यानंतर त्यांचा सांभाळ माझ्या सासूबाई कै. शशिकला नांद्रेकर यांनी केला व त्यांच्यावर चांगले संस्कार केले. पण, याशिवाय अगोदर नि नंतरही मला काम करायला लागायचं (सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८) कधी-कधी या वेळेपेक्षाही अधिक वेळ द्यावा लागायचा. त्यांच्या नोकरीत अगोदर नि नंतरची जी वेळेची सवलत मिळाली, त्यातून त्यांनी मुलं, कुटुंब, मुलांचे शिक्षण, संस्कार सर्व पाहिलं. खरं तर मीही त्यांच्या शिस्तीत शिस्तबद्ध राहिलो असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
 आम्हा पतिपत्नीत शिक्षण, सहवास, संस्कार यांतून परस्परांविषयी सद्भाव, सामंजस्य पहिल्यापासूनच आहे. आज ‘सुखी परिवार' म्हणून कुणीही आमच्याकडे पाहावं. पत्नीनं कॉलेजात शिकविण्याव्यतिरिक्त एन. सी. सी. अधिकारी, विभागप्रमुख अशी पदं भूषविली. त्यांना बागकामाची आवड असून, गार्डन प्रदर्शनात त्यांची अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
 तुम्हा उभयतांत मी सतत एक समाजऋणभाव पाहत आलो आहे. तो कशातून आला?
  खर सांगायचं तर भारतीय कुटुंबात पूर्वापर जात, धर्म यांच्या शिकवणीतून एक समाजभान आहे. कर्मकांडात ते आपण विसर्जित करून टाकतो. आम्ही उभयतांनी समाजधर्म प्रमुख मानला. काही लोक आम्हांस धर्मनिरपेक्षा (Secular) मानतात. धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ विज्ञाननिष्ठ आहे. त्यातून आम्हास हे भान आलं. मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची कास धरली. पत्नीनं बाहुबलीला ‘श्री १०८ शांतिसागर वृद्धाश्रमाचे कार्य, निवृत्तीनंतरचं जीवनकार्य म्हणून स्वीकारलं. ते त्या सहजधर्म म्हणून करीत आहेत. त्यांच्या नि माझ्या कामाचा आम्ही ठरवून कधी गवगवा केला नाही. ती आम्ही समाज उतराई मानतो.
 तुमची मुलं, सुना, नातवंडे यांच्यासह कुटुंबजीवन उपभोगता का आणि त्यासाठी वेळ काढता का?

 आम्हाला दोन मुलं. दोन्हीही कर्तृत्ववान निघाली, याचा आनंद व अभिमान आम्हा उभयतांना आहे. आमचा मोठा मुलगा आशुतोष तो ऑस्ट्रेलियाला

माझे सांगाती/२३