पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्यायालयात तो माझ्या लेखी प्रतिस्पर्धी, प्रतिपक्षच असायचा. त्यामुळे माझ्या पक्षकारांनी माझ्यावर कधी अविश्वास व्यक्त केला नाही. तेच माझ्या यशाचं श्रेयही आणि प्रेयही!
 तुम्ही मला नेहमी Workoholic वाटत आलाय.
 तो दोष नसून, व्यवसायाच्या संदर्भात म्हणाल तर गुणच. पक्षकार तुम्हाला मागेल तितके पैसे देत असेल, तर तो मागेल, अपेक्षित तो न्याय देण्यास तुम्ही बांधील असलं पाहिजे. मी सरासरी अठरा तास काम करत आलोय. त्यात वृत्तपत्रवाचन, साहित्य, अध्यात्म; पण कर्मकांड नसलेलं तत्त्वज्ञान वाचतो. लॉ जर्नल्स तर माझी बायबल्स होत. इकॉनॉमिक टाइम्स, महाराष्ट्र टाइम्स इतकीच स्थानिक वृत्तपत्रे वाचतो. एकाच वेळी तुम्ही लोकल असलं पाहिजे नि ग्लोबलही, हे भान मी ग्लोबलायझेशनपूर्वीपासून जपलं. सभा, समारंभात अनिवार्य असेल तरच जातो. कार्यालयीन वेळ, कोर्टवेळ, व्यक्तिगत कौटुंबिक जीवन या तीन सत्रांत सारं आयुष्य घालवलं, ते व्यवसायनिष्ठा अंतिम मानून. ही नशा नव्हे. हा ध्यास आहे, ध्येय आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर पैशाचं वैयर्थ कळतं. व्यवसायाला वैयर्थ शिवत नसतं. आजही मी, माझे कितीही केस लॉ झाले तरी, उमेदवार समजूनच प्रत्येक कज्जाची तयारी करतो. माझ्याकडच्या उमेदवार वकिलांना मी संधी देतो; पण त्यांच्यावर सोपवून मी कधी सशाची झोप घेतली नाही. कोर्टाच्या वेळेत मी अपवाद म्हणूनही कधी घरी थांबल्याचं आठवत नाही.
 बारमधील तुमचे मित्र, सहयोगी कोण?
 न्यायालयात अॅड. पी. के. चौगुले, अॅड. गोविंद पानसरे, अॅड. अप्पासाहेब नाईक हे माझे स्नेही, सुहृद होत. बारमध्ये आम्ही कधी उखाळ्यापाखाळ्या काढत बसल्याचे आठवत नाही. विविध प्रश्न, समस्या, कायदा, बदलतं वर्तमान, राजकारणातील समाज हेच आमच्या चर्चाचं केंद्र असायचं. कोर्टाला सुट्टी लागली (दिवाळी, मे महिना) की, आमच्या सहली ठरलेल्या. देशपरदेशांत कधी मित्रांसह, कधी सहपरिवार खूप पर्यटन झालं. ती चैन नसायची. असायचा तो विरंगुळा. पुन्हा नव्या दमानं कामात लागतो आम्ही. 'कामात बदल हीच विश्रांती' हे ब्रीद आजअखेर पाळत आलोय. त्यामुळे आयुष्य वाया गेल्याचा विषाद कधी मनी शिवला नाही. न्यायमूर्तीना दैवत मानून विधिसेवा बजावली. माझे सारे मित्र तसेच. समानशील, समानछंदी!
 व्यवसायात व्यग्र राहिल्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं, असं आज मागे वळून बघताना वाटतं का?

 नाही. पण एक आहे, माझ्या कौटुंबिक सुखासमाधानाचं सारं श्रेय माझ्या

माझे सांगाती/२२