पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आम्हां उभयतांत प्रेम असले, तरी सन १९६०-६२ चा काळ रोटीबेटी या पारंपरिक व्यवहाराचा होता. आम्ही समाजात, समधर्मीय असूनही त्या काळातील चतुर्थ, पंचम भेदांत विवाह म्हणजे आंतरजातीय विवाह केल्यातच जमा असायचा. त्यामुळे मुलीकडील माणसं पुरोगामी असूनही आमच्या घरातून आमच्या लग्नाला विरोध होता; पण, कालौघात सारं काही अलबेल झालं!
 वकील होण्याच्या प्रेरणेची बीजे सास-यांच्या प्रतिष्ठेत तर नव्हती ना?
 नाही. मी पदवी शिक्षण घेत असतानाच माझ्या मनात वकील होण्याची सुप्त इच्छा घर करून होती. मी खेड्यातून आल्यामुळे असेल; पण गावी शिक्षक, डॉक्टर, वकील यांना देव मानण्याचा तो काळ होता. कूळकायद्याचं वातावरण होतं. वकिलांना असाधारण महत्त्व, प्रतिष्ठा होती. अशील वकिलांची हॅट, बॅग घेऊन अनवाणी चालायचा तो काळ होता. आज ते सरंजामी वाटलं, तरी त्या काळात त्या व्यवसायाचं समाजमनावर गारुड होतं; त्यामुळे मी वकील व्हायचं ठरवलं. सासरे नंतर माझ्या जीवनात आले; पण त्यांच्या परंपरा, प्रतिष्ठेनं माझं स्वप्न उंचावलं, हे मात्र मान्य करायलाच हवं!
 एलएल.बी.च्या दिवसांबद्दल काही सांगाल?
 त्या दिवसांबद्दल सांगण्यासारखं काही नसलं, तरी एक मात्र खरं की, माझ्यातील व्यावसायिक त्या दिवसांनी घडवला. आमचे शिक्षक व्यवसायाने वकीलच होते. सकाळी शिकवून ते कोर्टात जात. त्यांच्या शिकविण्यातील अनुभवसमृद्धीमुळे ते अकॅडेमिक कम प्रैक्टिकल असायचे. अॅड. दाभोळकर, प्रा. केळकर, अॅड. आपटे, अॅड. नांद्रेकर यांचं शिकवणं ऐकणं ही पर्वणी होती. शहाजी लॉ कॉलेज त्या वेळी आत्ताच्या कॉमर्स कॉलेजच्या जुन्या कौलारू इमारतीत भरत असे. त्या प्राध्यापकांपासून प्रेरणा घेऊन पुढे मी कॉमर्स कॉलेजात ‘मर्कंटाइल लॉ' आणि शहाजी लॉ कॉलेजमध्ये स्पेशल कॉन्ट्रॅक्टर्स'सारखे विषय शिकविले. यामुळेच मी शिवाजी विद्यापीठ सिनेट, अकॅडेमिक काउन्सिल, मॅनेजमेंट काउन्सिलवर सुमारे सहा वर्षे कार्य करू शकलो.
 वकिलीची सनद मिळवून पहिल्यांदा प्रैक्टिस कुठे सुरू केलीत?

 सन १९६० ला बी. ए., एलएल. बी. होऊन मी भावाकडे हुन्नरगीला परतलो अन् प्रैक्टिस करायचा विचार करून चौकशी सुरू केली. तेव्हा आमच्या तालुक्याचं कोर्ट होतं चिकोडी. तिथं अॅड. एस. डी. कोठावळे यांची चांगली प्रैक्टिस होती. ते दिवाणी साइडचे कज्जे चालवत. तिथं बोली, लेखी सारं कन्नडमध्ये चालायचं. माझं खरं शिक्षण मराठीतून झाल्यानं बोलणं कळायचं;

माझे सांगाती/२०