पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मग मामांनी इंग्रजीची शिकवणी लावली. धर्माधिकारी सरांमुळे इंग्रजीची गोडी लागली. आत्मविश्वास आला. मरगळ गेली. तिमाही परीक्षेत इंग्रजीत तर मी पहिला आलो.
 अक्कोळकर सर आम्हांस इतिहास शिकवीत. सन १९४७ च्या भारतपाकिस्तान विभाजनाच्या काळात शौर्यपदकं प्रदान करण्यात आली होती. सरांनी त्याला अनुलक्षून विचारलेल्या प्रश्नाचं मी दिलेलं उत्तर बरोबर असल्याबद्दल सरांनी मला शाबासकी दिली व ‘असंच वाचत राहा', असं समजावलं. आजच्या माझ्या वाचनछंदाचं पहिलं बीज मला तिथं दिसतं. आज तर क्रम असा आहे की, जेवीन न जेवीन; पण वाचन अटळ!
 मग कॉलेज?
 अर्थातच राजाराम! त्या वेळी या भागात तेच एकमेव कॉलेज होतं. कॉलेजचं नाव होतं. मी चांगल्या मार्कोनी पासही झालो होतो. दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाल्यामुळे शिकणं सोपं झालं. राज्यशास्त्र व अर्थशास्त्र विषय घेऊन मी सन १९५८ ला बी.ए. झालो.
 कॉलेजच्या जीवनातील काही आठवणी आहेत?
 हो, आहोत ना. मला आठवतं त्याप्रमाणे कॉलेजची लायब्ररी चांगली होती. वाचनही भरपूर करीत असे. अर्थशास्त्र माझ्या आवडीचा विषय होता. त्यातही सहकाराकडे ओढ असायची. पदवीच्या वर्गात असताना एकदा अंतर्गत परीक्षेत ‘सहकारी शेती'वर प्रश्न विचारण्यात आला होता. मी इस्त्रायलचं उदाहरण, रशिया, अमेरिकेतील प्रयोग उद्धृत करून समर्पक उत्तर लिहिलं होतं. आमच्या प्रोफेसरसाहेबांना ते बेहद्द आवडलं होतं. त्यांनी उत्तर कसं असलं पाहिजे म्हणून ते वर्गात वाचूनही दाखवलं होतं. त्या घटनेचा माझ्या मनावर सकारात्मक प्रभाव पडला व मी करिअरिस्ट झालो.
 कॉलेजमध्ये खेळ, कला, वक्तृत्वात भाग घेतला होता?
 खेळ पाहायची आवड होती. वक्तृत्वाची; परंतु महाविद्यालयीन जीवनात भाषण केल्याचं नाही आठवत. नाही म्हणायला मला एन. सी. सी.ची आवड होती. चीनच्या युद्धात एन.सी.सी.च्या बळावर मला इमर्जन्सी कमिशनही मिळालं होतं. तो आनंद व अभिमानाचा भाग होता. कुस्तीचीही आवड होती.
 कॉलेजच्या जीवनात काही रोमँटिक घडलं वगैरे ?

 हो, माझ्या सुविद्य पत्नी प्रा. कांचन कापसे यांची नि माझी महाविद्यालयीन जीवनापासूनची ओळख. त्या बी. एस्सी. करीत होत्या नि मी बी.ए. बाईंचे घराणे उच्च. वडील नामांकित वकील. त्यांना शहरात मोठी प्रतिष्ठा होती.

माझे सांगाती/१९