पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/22

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


पण दरखास्त, अर्ज, अॅफिडेव्हिट या साध्या गोष्टी करणंही अवघड होऊन गेलं. मी कसातरी चार महिने प्रयत्न केला नि कोल्हापूरला प्रैक्टिस करायची ठरवून परत कोल्हापुरी आलो.
 कोल्हापूरला कुणाकडे प्रेक्टिस सुरू केली?
 कोल्हापूरला त्या वेळी अॅड. व्ही. पी. पाटील यांचं नाव, एक शिस्तीचा वकील म्हणून घेतलं जायचं. मी त्यांच्याकडे उमेदवारी सुरू केली. आज माझ्यात जी व्यावसायिकता तुम्हाला दिसते, त्याचे प्राथमिक धडे मी अॅड. व्ही. पी. पाटील यांच्याकडून घेतले.
 त्यांच्याकडून काय नि कसे शिकलात?
 १) कामाची बांधणी कशी करायची, कायद्याच्या चौकटीत केस कशी बसवायची याबद्दलचा अभ्यास अगोदर करावयाचा.
 २) प्रतिवादी असल्यास कोणता बचाव घ्यावयाचा व त्याला कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे?
 ३) उलटतपास कसा करायचा व आपल्याला अनुकूल बाबी कशा आणायच्या?
 ४) कामात चाललेल्या प्रगतीवर बारकाईने नजर ठेवणे.
 स्वतंत्र प्रैक्टिस केव्हा सुरू केली?
 विवाहानंतर. म्हणजे १९६४ च्या दरम्यान, सुरुवातीस दिवाणी दावे केले. नंतर मी सहकाराकडे लक्ष केंद्रित केले. यात माझे सासरे अॅड. नानासाहेब नांद्रेकर यांची मोलाची मदत, मार्गदर्शन मिळाले. ते सहकारातील नामांकित वकील होते. त्या वेळी पंचगंगा, बिद्री असे एक-दोनच सहकारी साखर कारखाने होते; पण, अनेक सहकारी संस्था, संघ होते. त्यांचे ते वकील होते. पूर्वी मी दिवाणी कज्जे करायचो. ते अधिक होते. नंतर सहकारी कज्जे अधिक झाले. मी दोन्ही बाजू चालू ठेवल्यामुळे सतत कामात व्यग्र राहिलो. दोन्ही बाजूचे कायदे माहीत असल्याचा फायदा झाला.
 तुमच्या व्यावसायिक यशाचे रहस्य काय?

 सर्वांत प्रथम म्हणजे अशिलाशी निष्ठा व बांधीलकी. अशील आला की, त्याचं डॉक्टरांच्या संयमानं सारं ऐकतो. त्याचं म्हणणं समजावून घेतो. त्याची गरज लक्षात घेतो. मग कागदपत्रे पाहतो. काम होणार असेल, नसेल ते स्पष्टपणे सांगतो. प्रयत्नांत कसूर करत नाही. तारखा वाढवून घेत नाही. लवकर न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न करतो. होमवर्क भरपूर करतो. व्यावसायिक कौशल्य, कायदा, कागदपत्रे हीच माझ्या व्यवसायाची साधने मानली. साधनशुचिता प्रमाण मानून काम केलं. विरोधी वकील मित्र असला, तरी

माझे सांगाती/२१