पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अप्रत्यक्षपणे पाच वर्षांत संस्था व महाविद्यालयाच्या लौकिकात भरच पडली. अपवाद म्हणूनही आम्हा उभयतांत, संस्था-महाविद्यालयात, प्राचार्य-प्राध्यापककर्मचा-यांत मतभेदाचा प्रसंग आला नाही. संघर्षाचे प्रसंग आले तरी! याचं श्रेय अॅड. के. ए. कापसे यांच्या उदार मनोवृत्तीसच द्यावं लागेल.
 या काळात माझे स्नेही अॅड. गोविंद पानसरे यांच्यामुळे, प्रा. सौ. कांचनताई कापसे यांच्या कार्यसहवासामुळे आम्ही इतके जवळ आलो की, ते आमचे कुटुंबीय झाले, ते मात्र एका घरगुती न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे!
 या सर्वांतून अॅड. कापसे यांच्या जीवन, विचार, छंद, स्वभाव, पैलू, वृत्ती यांचं-माझं स्वत:चं, असं एक व्यक्तीविषयक आकलन तयार झालं आहे. ते मुलाखतीच्या अंगाने मांडायचे अनेक दिवस डोक्यात होते. आज ते आपल्या आयुष्यातील निरपेक्ष कार्याचा गौरव साजरा करीत असताना, ‘बोनस लाइफ जगत असताना मांडणं यात त्यांचा लाभ कमी व समाजाचा अधिक! म्हणून हा प्रकट संवाद! या हृदयीचे त्या हृदयी!!!
 तुम्ही आयुष्याचा 'सहस्त्रावा चंद्र' पाहात आहात, कसं वाटतं ?
 कृतकृत्य!
 तुमचं मनःपूर्वक अभिनंदन! तुम्हाला शतायुष्य लाभो!!
 तुमच्या सदिच्छांबद्दल आभार; पण, या पुष्पगुच्छाची आवश्यकता नव्हती. पुस्तके ठीक आहेत. वाचीन. मला ती आवडतातही.
 मी स्वाध्याय करून आलोय. काही प्रश्न काढून घेऊन आलोय. तुम्ही एक नजर फिरवाल, तर बरे होईल. उत्तरातही सुसंगती येईल.
 ठीक आहे. वाचतो; पण असं काही भव्यदिव्य मी केलेलं नाही.
 तुम्ही सर्वांना माहीत आहात, ते आजचे अॅड. के. ए. कापसे एक निष्णात वकील, विविध संस्थांचे अध्वर्यु म्हणून. पण तुमचा पूर्वेइतिहास, विशेषतः जन्म, बालपण, कुटुंब, शिक्षण असं लोकांना फारसं माहीत नाही; ते सांगाल थोडं विस्तारानं?

 माझं मूळ गाव हुन्नरगी. आज ते चिकोडी तालुक्यात, बेळगाव जिल्ह्यात नि कर्नाटक राज्यात असलं, तरी जन्मावेळी मात्र ते तत्कालीन मुंबई इलाख्यात होतं. माझा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांचे नाव अण्णासाहेब दादा कापसे. ते फार शिकलेले नव्हते; पण साक्षर होते. व्यवहारी शहाणपण होतं. त्यांचा व्यवहार सचोटीचा होता. अगदी डायरीसारखं नियमित लिहीत नसले, तरी महत्त्वाचं लिहून ठेवायची त्यांना सवय होती. आईचं नाव तानीबाई

माझे सांगाती/१७