पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/17

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मला वेळोवेळी काम करण्याची संधी मिळाली नि लक्षात आलं की, मामांचं भाकीत खरं होतं.
 अॅड. के. ए. कापसेंना... त्यांना ‘साहेब' म्हटलेलं आवडतं नि दुस-यालाही... कनिष्ठासही ‘साहेब' म्हणून संबोधायची त्यांची उदारता मी कितीदा तरी अनुभवली आहे. ब्रिटिश प्रभावामुळे असेल, मला मात्र ते बिरुद लावायला अजिबात आवडत नाही; पण कापसेसाहेबांचं मात्र ते आवडतं बिरुद. त्या काळात संस्थापक कामाच्या निमित्ताने सतत कोर्टात जाणं व्हायचं. कज्जा, केसीससाठी नाही. मी त्या वेळी बालकल्याण संकुल विकसित करीत होतो. आमच्याकडे बाल न्यायालय भरायचं... दर शनिवारी. एक न्यायाधीश हे बाल न्यायाधीश म्हणून येत असायचे. शिवाय जिल्हा व सत्र न्यायाधीश आमचे विश्वस्त असायचे; त्यामुळे त्यांच्या अनेक बैठका, चर्चा, चर्चासत्रे यांतून कोर्टात माझ्या येरझाच्या असायच्या. तिथं अनेक न्यायालये होती. कोर्टात गेलो नि पट्टेवाल्यानं कापशे ऽऽ वकीऽऽल' असा पुकारा केला नाही, असा एक दिवसही आठवत नाही. विठूनामाच्या गजरासारखा पट्टेवाल्याचा होणारा नित्य पुकारा या वकिलांच्या सातत्यपूर्ण समर्पणाचा सन्मानच असायचा.
 मी ज्या श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाच्या महावीर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करायचो, तिथं १९९० च्या दरम्यान आंदोलनाचं वातावरण होतं. मी आमरण उपोषण आरंभलेलं. जुने पदाधिकारी समोर यायला धजावत नव्हते म्हणून श्री. तात्यासाहेब पाटणे व अॅड. के. ए. कापसे संस्थेतर्फे बोलणी करण्यास आले होते. त्या वेळी मला स्वप्रतिष्ठेपेक्षा समाजाची, संस्थेची प्रतिष्ठा मोठी मानण्याच्या त्यांच्या मनाच्या मोठेपणाची प्रचिती आली.
 पुढे तर कापसेसाहेब संस्थेचे चेअरमनच झाले. त्यांनी संस्थेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी केलेल्या विविध दिव्यांचा मी साक्षीदार आहे. 'साप तर मारायचा; पण काठी मोडायची नाही, अशा एखाद्या निष्णात समाजशल्यविशारदाच्या कौशल्याने त्यांनी संस्थेत अनेक बिनटाक्याच्या समाजशस्त्रक्रिया केल्या आणि आपली सचोटी, प्रशासनकौशल्य, योजकता सप्रमाण सिद्ध केली. प्राचार्य दिलीप कोण्णूर व अॅड. के. ए. कापसे नि महावीर भूपाल देसाई या त्रयींनी संस्था, महाविद्यालय अत्यंत संयमानं, अनेक मानापमान सहन करीत ऊर्जितावस्थेस आणली.

 प्राचार्य कोण्णूर सेवानिवृत्त झाले नि लोकाग्रहास्तव मला प्राचार्य व्हावे लागले. अॅड. के. ए. कापसे नि मी, आम्हा उभयतांचे जमेल की नाही, अशी शंका स्वत: आमच्यात होतीच. ती इतरांत असणेही स्वाभाविक होते; पण,

माझे सांगाती/१६