पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चराटे. माझी आई कोगनोळीची. घरी पारंपरिक व्यापार होता. आमची आठ एकर शेती होती. आईवडीलच ती कसत. घरात आम्ही दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार होता. माझा नंबर शेवटून दुसरा. दि. २३ मार्च, १९३४ रोजी माझा जन्म त्या वेळच्या परंपरेनुसार आईच्या घरी, आजोळी झाला.
 आपलं शिक्षण कुठं कुठं नि कसं झालं?
 माझं पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण जन्मगावी हुन्नरगीला, इलाखा पंचायतीच्या शाळेत झालं. शिक्षक चांगले होते. मी शाळेत शिकाव, अभ्यास करावा म्हणून वडील दक्ष होते. मी चांगले गुण मिळवून पास व्हायचो; पण, सातवीला धक्का बसला. आमच्या लहानपणी सातवीला सरकारी परीक्षा असायची. केंद्र परीक्षा. त्यात मी नापास झालो. वडील हादरलेच!
 मग काय झालं?
 माझी मावशी त्या वेळी मांगूरला होती. ती मला त्यांच्या गावी घेऊन गेली. त्या वेळी त्या शाळेत शिक्षक चांगले होते. त्या भागात ती शाळा अभ्यास करून घेणारी म्हणून प्रसिद्ध होती अन् झालंही तसंच. वडिलांची समजावणी, मावशीचं लक्ष, शिक्षकांचे प्रयत्न या सर्वांतून मित्र इत्यादी नसल्याने मी अभ्यास करू लागलो व आश्चर्य म्हणजे पहिल्या नंबरने पास झालो.
 तेव्हा कसे वाटले?
 फारसं काही कळत नव्हतं; पण आईचं साखर वाटणं, वडिलांची फुशारकी, मावशीच कौतुक, शिक्षकांची शाबासकी या सर्वांमुळे मीही हुरळून गेलो होतो खरा!
 मग हायस्कूलला कुठे गेलात?
 नंबर आल्यामुळे नि मामांकडे मी चांगला राहतो, शिकतो म्हणून मला कोगनोळीलाच ठेवण्याचा निर्णय झाला नि माझं नाव कागलच्या शाहू हायस्कूलमध्ये घालण्यात आलं. पहिले दोन महिने तर मी कोगनोळी-कागल पायीच येऊन-जाऊन शिकायचो. मग कागलला खोली करून राह लागलो. कागलच्या शाहू हायस्कूलमधूनच मी १९५४ साली एस.एस.सी. झालो. माझे मामा बंडू आदाप्पा चराटे, शाहू हायस्कूलचे धर्माधिकारी सर यांच्यामुळे हायस्कूलच्या काळात मी एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला जायचो.

 शाळा, हायस्कूलच्या काळात मी लाजराबुजरा विद्यार्थी होतो. मागे, कोप-यात बसायचो. नापास झालो असल्याने एक प्रकारचा न्यूनगंड मनात असायचा. तालुक्यातील इतर मुलं शहरी वळणाची, धीट, चुणचुणीत. सुरुवातीला करमायचं नाही. घरची, गावची ओढ असायची. निराश वाटायचं, ओशाळायचो.

माझे सांगाती/१८