पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१९८० मध्ये एकदम उद्योग करण्याचा धाडसी निर्णय घेतात. पी. व्ही. सी. पाईप उत्पादनात त्यांनी लक्ष घातले नि त्यांना अनपेक्षित यश लाभले ते त्यांच्या द्रष्टेपणामुळे. त्यांनी पुढे सन १९८७-८८ मध्ये आणखी एक धाडसी पाऊल उचलले ते म्हणजे त्यांनी पब्लिक कॉर्पोरेशनची स्थापना करून आपल्या उद्योगाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. भवरलाल जैन यांच्या प्रत्येक क्षेत्रातील यशाचे श्रेय त्यांचा अभ्यास, संशोधन, कालभान, द्रष्टेपण नि धडाडीस द्यावे लागेल. खानदेशात यापूर्वी कुणी इतकं मोठं साहस केल्याचं ऐकिवात नाही.
 त्यांनी सुरू केलेल्या जैन ठिबकला केवळ महाराष्ट्रातच नाही, भारतभर उदंड प्रतिसाद लाभला. पाण्याचे घटते प्रमाण व कसण्याखाली येणारे वाढते शेती क्षेत्र, त्यामधील विषमता व दरी ओळखून त्यांनी जैन ठिबक सिंचनचे उत्पादन, प्रचार-प्रसार, प्रगती इतक्या जोमाने आणि नेटाने केली की, सिंचन क्षेत्राबरोबर दुष्काळी भागातही तिचे समान स्वागत झाले. जैन शब्दाचा पर्यायी अर्थ ‘ठिबक' निर्माण करण्यापर्यंतचे अभूतपूर्व यश त्यांना लाभले. एखाद्या व्यवसायास आलेले यश हे राज्य नि देशाच्या सरकारचा कार्यक्रम होतो, हे अभूतपूर्व, अघटित असे सत्य होते. पुढे त्यांनी ‘जैन हिल्स' नावाने आज ओळखला जाणारा उजाड परिसर विकत घेतला. तो सिंचनप्रवण बनवून ‘सुजलाम् सुफलाम्' केला. 'आधी केले, मग सांगितले' असे सूत्र वापरून त्यांनी शेतक-यांची कोरडवाहू पिकाची मानसिकता बदलून सिंचनक्षम शेतीची गोडी शेतक-यास लावली. भरड माळावर नंदनवन फुलू शकते हा विश्वास भवरलाल जैन यांनी प्रात्यक्षिकांतून सर्वत्र रुजविला. पुढे ठिबकचे रूपांतर तुषार सिंचनात करून मोठी आघाडी घेतली व इस्राइलसारख्या शेतीतील प्रयोगांना मागे टाकले. जैन हिल्स, जैन व्हॅली, जैन अॅग्री पार्क, जैन फूड पार्क आज भारतातील शेतक-यांसाठी ‘कृषितीर्थ' बनले आहे. भारतभरातून रोज येणा-या शेतक-यांच्या सहली हा त्याचा पुरावा म्हणून सांगता येईल. त्यांच्या या पुरुषार्थाची नोंद घेऊन त्यांना आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार लाभलेत. फाय फाउंडेशन, क्रॉफर्ड मेमोरिअल अॅवॉर्ड, वर्ल्ड ट्रेड सेंटर जीवन गौरव, फोर्ल्स एशिया अशी मोठी यादी सांगता येईल.

 आपण जे केले ते त्यांनी शब्दबद्ध केले. मूळ मराठी पुस्तके कितीतरी. त्यांची हिंदी, इंग्रजी भाषांतरेही उपलब्ध आहेत. आजची समाजरचना', ‘अतिथी देवो भव', जलनियोजन’, ‘कार्यसंस्कृती', ‘उमललेले संवाद', 'वाघूरचं पाणी', 'पाषाणातून पाझर', 'मरुभूमीतून बाहेर', 'जैन हिल्सवरील जागरण', ‘मुरलेलं लोणचं’, ‘सुजलाम् सुफलाम्', 'थेंबभर पाणी, अनंत आकाश' ही

माझे सांगाती/१३०