पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/132

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आणि अशी पुस्तके लिहिणारा हा भगीरथ एकाच वेळी लक्ष्मीपुत्र नि सरस्वतीपुत्र होतो याचं रहस्य या माणसाच्या दिवसाची रात्र करण्याच्या अथक श्रमनिष्ठेत सामावलेलं आहे.
 दिवसाची रात्र म्हटल्यावर लक्षात आलेली गोष्ट सांगतो. अगदी अलीकडच्या काळात मी बार्शीला कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे स्मृती संग्रहालय उभारले. त्याचे उद्घाटन बडे भाऊंच्या हस्ते व्हावे म्हणून आम्ही त्यांना भेटण्यास गेलो होतो. पूर्वीच्या मानाने ते थकलेले होते. एक शस्त्रक्रिया नुकतीच झालेली; परंतु चेह-यावरचे हास्य, उमेद, उत्साह, मात्र पूर्वीचाच होता. आम्ही त्यांना दिलेले निमंत्रण त्यांनी सहर्ष स्वीकारले. गप्पात तब्येतीचा विषय निघाला. तर म्हणाले, “बाकी सगळे ठीक आहे. रात्रीची झोप मात्र कमी झाली; पण त्यामुळे एक प्रकारे फायदाच झाला म्हणायचा. आता रात्री मी युरोपचे काम करतो नि दिवसा आशियाचे! ते सहज बोलले; पण त्यातून त्यांचं वैश्विक उद्योगसाम्राज्य माझ्या लक्षात आले. शिवाय संकटे ही श्रमशील माणसास पर्वणी असते, याचाही एक नवा वस्तुपाठ मिळून ज्ञानात एक नवी भर पडली.
 पुढे आमच्या बार्शीच्या वस्तुसंग्रहालयाच्या उद्घाटनाच्या तोंडावर त्यांची प्रकृती ढासळली. कार्यक्रमावर मळभ साठू लागलं. ते येतील की नाही शंका, धाकधूक, म्हणून मी फोन केला. तर म्हणाले, “डॉक्टर, तुम्हाला शब्द दिला ना. मग मी येणारच. काहीही होवो.' नंतर मला खासगीतून समजलं की बडे भाऊंच्या या निर्णयाने घरचे सचिंत असणे स्वाभाविक होते. त्यात भाऊंनी रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला. काळजी अधिकच वाढली. घरचा विरोधही वाढणे स्वाभाविक होते. एका निर्वाणीच्या क्षणी ते म्हणाले, 'मी काय कुणाच्या मेजवानीस निघालोय? शून्यातून विश्व उभारलेल्या एका सामान्यातून कर्मवीर झालेल्याचं स्मारक लोकार्पण करायला निघालोय. ते करताना मरण आलं तर उलट मी सामाजिक हुतात्मा होईन.' मग मात्र सारं कसं शांत नि सहज घडलं. बडे भाऊ आले. दोन मजले थांबत-थांबत चढून वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. सुंदर भाषण केले. भाषणातून लक्षात आलेली गोष्ट अशी की ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांचे जीवनकार्य समजून घेऊन आलेले होते. येण्यामागे पण इतरांप्रती श्रद्धाभाव होता. संस्थेच्या सर्व मुलांची बडे भाऊंच्या संवादाचा कार्यक्रम ठेवला होता. मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. अनुभूती विद्यालयातही ते नेहमी मुलांशी संवाद साधत असत. माणसाचं मोठेपण दुस-याचं होण्यात असतं, हे भाऊंकडे बघून लक्षात येते.

माझे सांगाती/१३१