पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भाऊंनी महात्मा गांधींचे जीवन व कार्य अत्यंत प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविले होते. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी' हे संतवचन त्यांनी आचारधर्म बनविल्याचे माझ्या लक्षात आले. गांधी तीर्थबरोबर मी त्यांचे अनुभूती' विद्यालय पाहिले. एकच दर्जाची दोन विद्यालये. एक श्रीमंतांसाठी, तर दुसरे गरिबांसाठी. एका श्रीमंत पालकाने आपण दिलेल्या फीतून एका गरीब मुलाला शिकवायचे. समाजवादावर आयुष्यभर नुसतं भाषणं देत फिरण्यापेक्षा बडे भाऊंची ही कृती प्रभावी समाज परिवर्तन करणारी होती. ‘गांधी तीर्थ' इतके भव्य की, महात्मा गांधींच्या साधेपणाचे वैभवी उन्नयन! त्याबद्दल मतभेद असूनही त्यामागची श्रद्धा, समर्पण, प्रभावीपणा हा अपराजेयच. बडे भाऊचं समग्र जीवन म्हणजे साध्या विचारांचे प्रभावी आविष्करण वाटत आले आहे.
 भवरलाल जैन यांनी हे सारं केलं, उभारलं ते जर आपणास समजून घ्यायचे असेल तर त्यांची घडण आपण पाहायला हवी. भवरलाल जैन यांचा जन्म १२ डिसेंबर, १९३७ रोजी जळगाव जिल्ह्यातील वाकोड नामक छोट्या खेड्यात झाला. ते गाव, तो काळ, ती माणसं सारं ‘वाकोदचा वटवृक्ष'मध्ये चित्रीत केले आहे. त्यांचे पूर्वज राजस्थानातील, व्यापारउद्योगाच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले नि इथल्या माती व माणसांत मिळून मिसळून गेले. पूर्वापार त्यांच्या घराण्यात संयुक्त कुटुंबाची प्रथा. ती भवरलाल जैन यांनी आपल्या आयुष्यातही श्रद्धेने जपली, जोपासली; पण भवरलालजी यांचे श्रेय आपल्या पत्नी कांताबाईंना देतात. आपल्या पत्नीबद्दल त्यांनी ‘ती आणि मी' या आत्मचरित्रात भरभरून लिहिलं आहे. आपल्या यशाचं सारं श्रेय ते पत्नीच्या वटवृक्षी व्यक्तिमत्त्वास, तिच्या त्याग नि समर्पणास देतात.

 भवरलालजी वयाच्या तेविसाव्या वर्षी विधी विशारद झाले. मनात आणलं असतं तर ते नामांकित वकील होऊ शकले असते; पण त्यांनी वडिलार्जित शेती कसणे पसंत केले. शेती व्यवसायातील अशाश्वतता त्यांनी अनुभवली व व्यवसाय करायचे ठरवले. प्रारंभी त्यांनी ढकलगाडीतून रॉकेल विकायला सुरुवात केली. व्यवसायात यशस्वी व्हायचं तर श्रमाची लाज बाळगायची नाही, हा यशाचा मूलमंत्र त्यांनी वडिलांच्या चरित्रातून अंगीकारलेला होता. नंतर त्यांनी व्यापार थाटला. पूर्वापर चालत आलेले अवघे सात हजार रुपये कनवटीला होते. त्या बळावर त्यांनी व्यापार करीत परत शेतीत लक्ष केंद्रित केलं. एव्हाना त्यांच्या लक्षात आलं होतं की, भारतासारख्या देशात शेती, व्यापार व उद्योग असा त्रिमितीय व्यवसाय केल्याशिवाय स्थैर्य व समृद्धी लाभणार नाही. सन १९७२-७४ मध्ये शेतीकेंद्रित मनाचे भवरलाल जैन सन

माझे सांगाती/१२९