पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/126

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


विद्यार्थी वसतिगृह होतं. ते पूर्वी राजारामपुरीच्या अकराव्या गल्लीत होतं. माझ्या आठवणीप्रमाणे तेथील मुलांच्या औषधोपचाराची जबाबदारी डॉ. करंडेंनी स्वतः स्वीकारली होती. विशेष म्हणजे नाममात्र असलेली फी घेणे तर सोडाच; पण त्या विद्यार्थ्यांना ते पदरमोड करून औषधोपचार करीत. धन्वंतरी हा गरिबांवर उपचार करणारा योगी होता तसे हे डॉक्टर. कुठेही आपली गरज दिसली की तिथे स्वतः जाण्याचा त्यांचा रिवाज खानदानी सभ्यता सिद्ध करणारा असायचा. आपल्याकडे जे आहे, ते दुसन्यास देण्याची त्यांची धडपड त्यांचं संवेदी मन व्यक्त करणारी होती.
 डॉ. विजय करंडेंचे पूर्वज मूळ कोकणातील. कोल्हापुरात आलेल्या मूळ कोकणवासीयांची एक संस्था होती. ‘कोकण मित्र मंडळ' तिचे नाव. संस्थेचे मूळ काम कोकणची संस्कृती जपण्याचे व नव्या पिढीत ती रुजविण्याचे असायचे. म्हणजे जे कोकणवासी कोल्हापुरात येऊन स्थायिक झालेत, घरे बांधलीत, त्यांनी आपल्या परसात, अंगणात नारळ, पोफळी, अबोली, आंबा लावावा. कोकण शॉपीत कोकणचे पदार्थ व मेवा मिळावा. सण साजरे करावेत अशी कल्पना; पण त्या संस्थेचे कामाचे स्वरूप क्लबसारखं औपचारिक होत गेलेलं. डॉ. करंडे संस्कृतिहरणानी अस्वस्थ असत. त्या अस्वस्थतेतून ते या मंडळाचे अध्यक्ष झाले. मित्र मेळावा, कोकण महोत्सव, संस्थेसाठी इमारत, कोकण साहित्य चर्चा असे नानाविध उपक्रम हाती घेऊन त्यांनी संस्थेचे पुनरुज्जीवन केले होते. त्यांच्या काळात मी एक-दोन उपक्रमांत कोकणचा नसून पाहणा होऊन जे कोकण समजावून सांगितले होते, त्यामुळे डॉ. करंडे बेहद्द खुश होते. त्यांची गुणग्राहक वृत्ती अनुकरणीय होती.
 कोकणातून आलेले गृहस्थ म्हणून असेल; त्यांचे सर्व बालपण, काही शिक्षण कोकणात झाल्यामुळेही असेल, निसर्गाची त्यांना उपजत आवड होती. कोल्हापुरातील काही मित्रांनी एकत्र येऊन ‘निसर्ग मंडळ' स्थापन केले होते. त्यातून निसर्गभ्रमंती असायची. डॉ. करंडे त्यात सपरिवार सामील होत असत. मूळचे कोणकातील असल्यामुळे असेल, ते उदारमनाचे गृहस्थ होते. त्यांच्या अंगणात कलमी आंब्याचे मोठे झाड होते. त्यास खूप आंबे लागत. डॉक्टर आपल्या सर्व आप्त-स्वकीय, मित्रमंडळींना ते वाटत. ते जोपर्यंत हिंडत-फिरत तोपर्यंत न चुकता उतरलेले डझनभर आंबे प्रेमाने आणून देत. डॉक्टरांकडून आंबे आले म्हटले की मग माझे पाय मंडईकडे वळत असत. या उपक्रमात डॉक्टरांचे प्रेम एकतर्फी होत राहायचे. त्यात खंड नसायचा. ही नम्रता, मोठेपणा त्यांच्यात कुठून आला होता, याचा शोध घेताना लक्षात येते की पुरुषांचे


माझे सांगाती/१२५