पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दवाखान्यात जाण्यापूर्वी डॉक्टर इथे पेशंट तपासत. ही मोठी सोय होती. डॉक्टर रोज सकाळी आपलं पामेरियन कुत्रं घेऊन नियमित फिरायला जात, तेव्हाही ‘हायऽ ऽ हॅलोऽ ऽ' होत असे.
 अंकुर जन्मून सहा महिनेही झाले नसतील. सायंकाळी त्याच्या नाकातून रक्त वाहायला लागले, ते थांबेनाच म्हणून डॉक्टरांकडे गेलो. ते दवाखाना बंद करत होते. त्यांनी बाळाला पाहिलं. त्यांनाही काय करावं सुचेना. त्यांनी डॉ. गोगटेंना फोन लावला. तेही दवाखाना आवरून निघायच्या तयारीत होते. ई.एन.टी.सर्जन ते. डॉ. करंडेंच्या शब्दासाठी आम्ही जाईपर्यंत थांबून होते. बाहेर आकाश फाटले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. डॉ. करंडे यांनी स्वत:ची गाडी काढली. भर पावसात आम्हास नेलं. डॉ. गोगटेंनी तपासणी, स्वच्छता करून कसलंसं इंजेक्शन दिलं. बाळाच्या नाकात कापसाच्या नळ्या भरल्या अन् थोड्या वेळानं रक्त थांबलं नि आम्ही निश्चिंत झालो. डॉक्टरांनी बाळाला मांडीवर घेऊन रात्र काढायची सूचना दिलेली होती. आम्ही दोघे आळीपाळीने जागे. आई मात्र रात्रभर जागीच होती. पहाटे पाचला दारावर टकटक झाली. उघडतो तर डॉ. करंडे दत्त! ‘बाळाचं रक्त थांबलं का? मला रात्रभर झोप नव्हती म्हणून इतक्या सकाळी आलो. आजच्या काळात पेशंटच्या व्यथा, वेदनांत असा परकाया प्रवेश करणारा डॉक्टर शोधून सापडणे दुर्मीळ! त्या दिवशी मला डॉक्टर प्रेषितापेक्षा कमी नाही, हे लक्षात आले.
 डॉ. करंडे पेशंटचं टोकाचं करीत. पेशंटनी पण पाठपुरावा करीत डॉक्टरांना प्रगती कळवली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असायची. त्यात गैर काहीच नसायचे. मी अंकुरची प्रगती त्यांना फोनवर सांगितली होती; पण त्यांच्या लक्षात नव्हती. त्यामुळे एकदा ते प्रथमदर्शनी माझ्यावर उखडले; पण नंतर समजून घेतले. डॉक्टर-पेशंट हे उभयपक्षी नाते निर्माण करण्यात, जपण्यात, ते वाढवण्यात डॉ. करंडेंचा प्रयत्न केवळ मानवधर्मी व मानवसेवी असायचा. मोठ्यांपेक्षा छोट्या पेशंटमध्ये ते अधिक रमायचे. मुलेही त्यांच्याकडेच जायचा हट्ट धरत. डॉ. करंडेचा आदर्श साने गुरुजी होता. पेशंट प्रतीक्षालयात एकच फोटो होता, तो म्हणजे साने गुरुजींचा. ऐंशीच्या दशकात दोन-पाच रुपये केसपेपर फी म्हणजे मोफत वा धर्मादाय दवाखाना चालविल्यासारखेच होते. जवळ वड्डुवाडी होती. तेथील पेशंट अधिक असतं, म्हणून उच्चभ्रू डॉक्टरांकडे येत नसत. ही त्यांच्या ‘जनता डॉक्टर' असल्याची पोहोचपावतीच होती.

 आणीबाणीच्या काळात मी कोल्हापूरच्या आंतरभारती शिक्षण संस्थेच्या विविध शाळांत शिक्षक म्हणून कार्यरत होतो. त्या काळात आमचं मागासवर्गीय

माझे सांगाती/१२४