पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मातृहृदयी असणे ही खास कोकणच्या मातीची किमया. कोकणी माणूस फणसासारखा. कधी काटे मिळणार पण लक्षात राहणार गच्याचं मऊपण नि मिठासच. कोकणी माणूस एकदा का तुमचा झाला मग तो ताईतच. निष्ठा शिकावी कोकणी माणसापासूनच. डॉ. करंडे या वृत्तीचा मूर्तिमंत आदर्शच!
 मी पीएच. डी. झाल्यानंतर अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांच्या संगोपन व पुनर्वसन कार्यास वाहून घ्यायचं ठरविले. हा काळ साधारणपणे १९८० चा होता. रिमांड होम ही माझी मातृसंस्था. तिच्या आधारामुळे मी स्वावलंबी झालो होतो. उतराई म्हणून काम सुरू केले होते. साधारणपणे पहिली पाच वर्षे संस्था समजून घेण्यातच गेली होती; पण हळूहळू आम्ही संस्थेचा सेवाविस्तार करायचे ठरवून मुलींचे निरीक्षणगृह, अनाथ मुलांसाठी अनिकेत निकेतन सुरू केले होते; पण अनाथ अर्भकांना सांभाळण्याचे दिव्य करू इच्छित असायचो. पण धाडस नाही व्हायचे. अनाथ अर्भकांना सांभाळणे हे जबाबदारी व जोखमीचे काम होते. ही बाळं सरकारी दवाखान्यात असत. अनेक मृत्युमुखी पडत. 'वात्सल्य बालसदन' हे अनाथ अर्भकांचे पाळणाघर सदृश शिशुगृह सुरू करायचे योजत असताना डॉक्टर ही मुख्य गरज होती. डॉ. करंडे एका पायावर तयार झाले, तसे आमच्या उत्साहास उधाण आले. सन १९८६ ला स्वातंत्र्यदिनी की प्रजासत्ताक दिनी आम्ही 'वात्सल्य बालसदन सुरू केले नि पहिल्याच वर्षी एखादा अपवाद वगळता आम्ही सर्व दाखल बाळे जगवू शकलो. इतकेच नव्हे तर त्यांना दत्तक पालक देऊन सनाथ करू शकलो, याचे खरे श्रेय डॉ. करंडे, नर्सेस व काळजीवाहक मातांच्या समर्पणासच द्यावे लागेल.

 डॉ. करंडे यांचे आठवड्यातून एकदा येणे अपेक्षित होते; पण गरजेप्रमाणे ते कितीही वेळ येत. प्रत्येक मुलाचे लसीकरण पाहत. उपचार करीत. आपल्याकडील औषधे आणत. कमी पडली तर मित्रांकडून आणत. पाहता पाहता मुलांचा आकडा २५-३० झाला; पण डॉक्टर करंडे न थकता सर्वांचे करत. इतर मोठ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबीरे घेत. राणी म्हणून अपंग मुलगी होती. केवळ डॉक्टर करंडेंमुळे ती चालू लागल्याचे मला आठवते. तिच्यासाठी ते नारायण तेल आणत. स्वतः तिला चोळत. डॉ. करंडे आमच्या लेखी ‘ख्रिश्चन मिशनरी' वृत्तीने सेवा करीत. त्यात असलेली निरपेक्षता त्यांना तर 'देवदूत' सिद्ध करणारी असायची. मुला-मुलींच्या, संस्थेच्या सर्व उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आत्मीय असायचा. वीसएक वर्षे त्यांनी किमान दोन हजार अर्भकांना जीवनदान दिले होते. ही समाजबांधीलकी, हे व्रत ते अबोलपणे, भूमिगत होऊन करीत राहत.

माझे सांगाती/१२६