पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आवड्याभराने मी परत ‘गर्जना'मध्ये दत्त. सतीश पाध्ये नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होते. हात धुळीने माखलेले. अंगठ्याच्या टोकाने कानावर ओघळलेला चष्मा वर करीत म्हटले, ‘बसा, हे माझं कायम असंच चालणार'. माझ्या लक्षात आलं की हा कायम घाण्याला जुंपलेला बैल आहे. याला उसंत अशी कधी मिळणारच नाही. त्या वेळी मुद्रणालयाच्या माडीवर त्यांचे बंधू बिहारींचे स्क्रीन प्रिंटिंगचे युनिट चालायचे. आज तिथे सतीश पाध्येंचे बाइंडिंग युनिट कार्यरत आहे. सतीश, बिहारी व मी अशा संयुक्त श्रमदानाने ‘त्या’ फाईल्स जमवल्या, लावल्या. मुद्रणालयाच्या पसाच्यात मला त्या फाईल्स स्वास्थ्याने पाहता येणार नाहीत म्हणून सतीश पाध्ये मला शेजारच्या आपल्या वाड्यात घेऊन गेले नि चक्क माजघरात एक चौरंग, पाण्याचा तांब्या आणि पत्नीला चहाचा हुकूम अशी सरबराई करते झाले. पत्नीही त्याच आदबीने सारे करीत होती. या सर्वांतून समस्त पाध्ये कुटुंबीय आतिथ्यशील, संस्कारी, सुसंस्कृत असल्याचे लक्षात आले. हा सन्मान माझा नसून कार्याचा होता. त्यातून कुटुंबाची समाजशील ओळख माझ्या मनी-मानसी ठसत गेली, ती कायमची.
 गेल्या वीसएक वर्षांत आम्ही अनेक प्रसंग नि कारणांनी एकमेकांच्या जवळ येत गेलो नि माझ्यासाठी सतीश पाध्ये केवळ सतीश झाले. मला जुनी पुस्तके नेटकी करून जपायचा छंद आहे. कोणतेही संग्रहातील पुस्तक बांधायचे असले की माझे पाय सतीशकडे वळतात. सतीश ते तत्परतेने करून देतो. त्याच्यात एक दोष आहे. तो पट्टीचा व्यावसायिक आहे; पण व्यापारी नाही. व्यावसायिक काम निष्ठेने, चोख करण्याचा त्याचा रिवाज आहे. कार्यसंस्कृती हा त्याचा धर्म आहे. पूर्वी तो खिळे जुळविणे, गॅलीप्रफे काढणे, तपासणे, दुरुस्ती, मुद्रण, बांधणी अशी सारी कामे करीत असे. आताही तो करतो. काम करण्यास सदैव तत्पर असणारा सतीश पैसा, व्यवहार म्हटला की याची जीभ झाली जड. तो मालाबरोबर बिल देईल; पण ‘बिल द्या नि मग माल न्या' असा कसाई बाणा त्याने कधी अंगीकारला नाही. मला कधी-कधी प्रश्न पडतो की याचं चालतं कसं? तर त्याचा मला लागलेला शोध आहे. ते त्याचं न संपणारं, न आटणारं गुडविल होय. हे गुडविल सर्वत्र ‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी' म्हणजे पुरवठादार, ग्राहक, नोकर, घरीदारी सर्वत्र पसरलेले असते.

 तशा अर्थाने सतीश नको तेवढा सज्जन, अजातशत्रू मित्र! कुणाबद्दल वाईट बोलणं, वागणं त्याला माहीत नाही. कुणी वाईट वागला तर टोकाचा क्षमाशील, ‘फरगिव्ह ऍड फरगेट' हे त्याचं जीवन तत्त्वज्ञान असल्याने मला तो कधी चिंताग्रस्त, चिंताक्रांत दिसला नाही. एखादी जिव्हारी गोष्टही सहज

माझे सांगाती/११३