पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सभ्यतेचा सत्त्वशील उपासक : सतीश पाध्ये

 सतीश पाध्ये यांना मी ओळखू लागलो, तो काळ १९९५-९६ चा असेल, तेव्हा मी बालकल्याण संकुलाच्या विकासकार्यात सक्रिय होतो. संकुलाची मातृसंस्था असलेल्या जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेची स्थापना १९४८-४९ मध्ये झाली होती. त्या संस्थेचा सुवर्णमहोत्सव करायचे घाटत होते. संस्थेचा दप्तरी अहवाल वगळता इतिहास म्हणून तिच्याजवळ काही नव्हते. म्हणून मी तत्कालीन वृत्तपत्रांच्या जुन्या अंकांच्या फाईल्सचा शोध घेत होतो. पुराभिलेखागार पालथे घालून झाले होते. दैनिक पुढारी, सत्यवादीच्या जुन्या फाईल्स शोधून झाल्या होत्या; पण स्थापनाकाळात ‘विद्याविलास', 'गर्जना' साप्ताहिक प्रकाशित होत होते, अशी माहिती करवीर नगर वाचन मंदिराच्या शोधात हाती आली. ‘विद्याविलास'च्या प्रकाश गोखले यांना गाठले तर विद्याविलास'च्या फाईल्स पुरात वाहून गेल्याचे लक्षात आले. राहता राहिला आधार ‘गर्जना' साप्ताहिकाचा. शोध काढत मी उभा मारुतीजवळ गर्जना प्रेसमध्ये धडकलो. सतीश पाध्ये गडबडीत होते. 'गर्जना' फाईल्स आहेत; पण अडगळीतून शोधून काढाव्या लागतील पण मी त्या काढून ठेवतो; ‘मला थोडा वेळ द्या', म्हणत त्यांचं आर्जव एका नम्र, सभ्य माणसाचं होतं. ते मला कामामुळे व कामाला ओळखत होते. कामाविषयीची आस्थाही मला त्यांच्या बोलण्यातून, देहबोलीतूनही व्यक्त होत होती. प्रथमदर्शनी आपण अपवाद सभ्य माणसाच्या सहवासात आल्याची जाणीव झाली. मी सुखावलो. तद्वत अस्वस्थही झालो.


माझे सांगाती/११२