पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/112

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आयोजनात जितके सक्रिय तितकेच अन्यत्र जाऊन शोधनिबंध वाचनातही आघाडीवर. त्यांनी अनेक पुस्तके, स्मरणिका, चरित्रग्रंथांची संपादने केली आहेत. त्यांच्या कार्यकालात डॉ. प्राचार्य पाटील यांनी ‘विवेक रिसर्च जर्नल' सुरू करून अभिनव उपक्रम अनुकरणीय असतो हे दाखवून दिले आहे. अनेक विद्यापीठांत जाऊन त्यांनी उच्च शिक्षणातील बदलते प्रवाह समजून घेऊन त्यानुसार आपल्या महाविद्यालयात अनेक योजना, प्रकल्प व अभ्यासक्रम सुरू केले आहेत. इमारती उभ्या करण्याच्या भौतिक, भडक विकासापेक्षा मानवी आत्मिक विकासाची कास धरत त्यांनी जो मनुष्यविकासाचा आलेख उंचावला, तो मला अधिक महत्त्वाचा नि लोभस वाटत आला आहे.

 प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील हे शैक्षणिक सेवेतून उच्चपदस्थ म्हणून निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर ते शिक्षणकार्याशी संलग्न राहातील असा माझा होरा आहे. संस्थेने त्यांच्या कार्य, कौशल्य, शैलीचा वापर करून घ्यायचे ठरविले तर तो संस्थेचाच प्रगल्भपणा नि दूरदृष्टी ठरेल. त्यांनी स्वत:स अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याची मनोरथे रचली आहेत. त्यातून त्यांची समाजाप्रती असलेली प्रतिबद्धता, बांधीलकी स्पष्ट होते. त्यासाठी मित्र, स्नेही म्हणून माझ्या शुभेच्छा. सहकार्य राहीलच. उर्वरित आयुष्यात त्यांनी लेखन करावे अशी मी अपेक्षा करीन; कारण त्यांच्यातील ती ऊर्जा नि ऊर्मी अद्याप सुप्तच राहिली आहे. राजापूरच्या गंगेला केव्हातरी प्रगट व्हावेच लागते. निवृत्तीचा काळ त्यासाठी उपकारक ठरावा. त्यांच्याकडे संयत वक्तृत्वाचे कौशल्य आहे. संस्था व अन्य महाविद्यालयांना त्याचा त्यांनी लाभ द्यावा. 'दिल्याने वाढतेचा रिवाज ते जपतील, जोपासतील. त्यातून ‘मीच नाही, माझ्यासह अनेक'ची वर्धिष्णू परंपरा समृद्ध होईल. त्यांचे महाविद्यालय, स्वकीय सहकारी सर्व मिळून त्यांचा गौरव करताहेत. उगवत्या सूर्यास सर्वजण अर्थ्य अर्पण करीत असतात नमन हा कृतज्ञतेचा उद्गार खरा! तो समाज जपतो ही प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांची मुंगी बनून केलेली बेगमी मानतो. उत्तरायुष्यार्थ शुभेच्छा! आरोग्यवर्धक भविष्याच्या सद्भावना!!

माझे सांगाती/१११