पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रचितीही असते. ती प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील यांनी सायास संपादली आहे. त्याबद्दल ते अनुकरणीय अभिनंदनास पात्र आहेत.
 जो मनुष्य हरघडी शिकत राहतो, त्याच्या विकासाला क्षितीज नसते, असे म्हटले जाते; ते प्राचार्य डॉ. पाटील यांच्या जीवनाकडे पाहिले की उमजते. पूर्वी ते प्रक्षिप्त असत. राग अनावर असायचा. बोलणे थोडे ओरखडे ओढणारे असायचे. ते उपजत होते. ते बहुधा पारंपरिक गावपाटीलकीतून पाझरलेले असावे; परंतु नंतर ते त्यांनी प्रयत्नपूर्वक सुधारले. दोषांचा व्हास, निरास नि गुणांचा भूमितीपटाने विकास हे सारे आपसूक नाही घडत. माणसास स्वविकासाचा छंद जडावावा लागतो. मग प्रत्येकाकडून शिकण्याचे वेड माणसास लागते. ते वेड त्यांनी लावून घेतले नि त्यातून त्यांची एक नवी प्रतिमा आज आपण सर्व पाहात आहोत. आज डॉ. पाटील मनुष्यसंग्रही, समाजशील, विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून सर्वश्रुत आहेत. सहज लक्षात आणून दिलेली गोष्ट ते गंभीरपणे स्वीकारतात. हे मी अनेक प्रसंगांत अनुभवले आहे.
 ते ज्या कार्यालयात बसतात, तिथे पूर्वी फलक होता, ‘पादत्राणे बाहेर काढावीत.' मी त्यांना एकदा प्रसंगाने त्या फलकाच्या अनुषंगाने ओशो नि हरिवंशराय बच्चन यांचा किस्सा ऐकविला. त्यांनी फलक काढून टाकला. मी त्यांना 'वेब साहित्य' हे माझे नवसंशोधित पुस्तक भेट दिले. त्यांनी मराठीत वेब साहित्य संशोधन करून आपण नवे शिक्षक होण्यास उत्सुक असल्याचे दाखवून दिले. मध्यंतरी त्यांचे वडील निवर्तले. त्यांना श्राद्ध, आदी कर्मकांड न करता अनाथांचे संगोपनकार्य करणा-या बालकल्याण संकुलास साहाय्य केले. मध्यंतरी आम्ही बालकुमारांमध्ये वाचन आवड निर्माण व्हावी म्हणून अभियान सुरू केले; तर त्यात ते स्वेच्छे सामिल झाले. अशा अनेक प्रसंगांतून माझ्या लक्षात आले की वरवर मितभाषी वाटणारा हा मित्र आतून संवेदनशील व संवादी आहे. सतत नव्याचा, अंगिकारण्याचा त्यांचा ध्यास ‘अत्त दीप भव'चे अनुगमनच! दुस-याचे मोठेपण स्वीकारण्याचा त्यांचा उमदेपणा त्यांना मोठा बनवत निघाला आहे. देश, विदेश भ्रमण, भेटीतून ते आधुनिक होत आज पुरोगामी झालेत. मराठी प्राध्यापक म्हणून ते स्वत:स अद्यतन ठेवतात. नवे, निवडक वाचण्यातून त्यांची अभिरुची कळते, तसाच चिकित्सक चोखंदळपणाही लक्षात येतो. ग्रंथालयावर प्रेम करणारा प्राचार्य ही ख-या शैक्षणिक प्रशासकाची कसोटी. ती त्यांनी ग्रंथसंख्या वाढ, ग्रंथालय सुविधा विकासातून सप्रमाण सिद्ध केली आहे.

 महाविद्यालयाच्या परिसरातील प्राचार्य हा समाजपरिघात कसा असतो, वावरतो यावरून त्याचे खरे मित्र, चारित्र्य व चरित्र उलगडत असते. ते अनेक व्याख्यानांना सश्रद्ध श्रोते बनून उपस्थित राहत असतात. चर्चासत्र, परिसंवाद

माझे सांगाती/११०