पान:माझे सांगाती (Maze sangati).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिवशी त्यांचा आलेला एक आश्वासक व सहानुभूतीचा फोन मी कधीच विसरू शकणार नाही. ते म्हणाले होते, हे फक्त तुम्हीच करू शकता. यात स्वदोष स्वीकृतीबरोबर परगुणग्राहकतेचा भाव होता. ते प्रशासन कौशल्य टिपत, हेरत, आत्मपरीक्षण करीत स्वत:ला घडवत होते नि आपणच आपला शिल्पकार होण्याचा तो एकलव्यी तपश्चर्येचा काळ होता. त्यातून आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी न राहता मित्र झालो.
 पुढे वर्षभरातच मी माझ्या महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरू केली. ती घटना आमच्या महाविद्यालयाच्या पारंपरिक प्रतिमेस छेद देणारी होती. प्राचार्य डॉ. पाटील यांनी या घटनेस गंभीरपणे घेतल्याचे माझ्या लक्षात आले. तेव्हा आम्ही महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अनेक विषयांचे एम. फिल. कोर्स सुरू केले होते. त्यांच्या महाविद्यालयांतील व माझ्या महाविद्यालयातील सहका-यांचे एकमेकांच्या महाविद्यालयांतील आदानप्रदान वाढून संस्था म्हणूनही आम्ही एकत्र भावाने काम करू लागलो होतो. यातून एकमेकांच्या गुणदोषांची, उपक्रमांची उजळणी सुरू झाली आणि देवाणघेवाणीतून आत्मीयतापूर्ण नाते विकसित झाले.
 मी निवृत्त झाल्यानंतर प्राचार्य डॉ. पाटील नि माझ्यात गुणवत्ता केंद्री मैत्री झाली नि ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहिली आहे, याचे श्रेय मात्र प्राचार्य डॉ. पाटील यांच्या गुणग्राहक सद्भावासच द्यावे लागेल. प्राचार्य म्हणून त्यांनी केलेले कार्य हे त्यांची कार्यक्षमता सिद्ध करणारे खरेच. त्यांच्या कार्यकालात विवेकानंद महाविद्यालय उच्च शिक्षण क्षेत्रातील विकासाचा मानदंड बनले. आज हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्वाधिक शिष्यवृत्ती, पुरस्कार पटकावणारे महाविद्यालय म्हणून विद्यार्थ्यांची प्रथम पसंती' जसे

आहे, तसेच ते उपक्रमशील महाविद्यालय म्हणून लोकदरास पात्र ठरले आहे. नियतकालिक स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विवेकवाहिनी, पर्यावरण जागृती हे सारे करीत शैक्षणिक गुणवत्तेत आपले महाविद्यालय अग्रेसर व अग्रणी ठेवणे यासाठी प्रशासकास रात्रीचा दिवस करावा लागतो. प्रसंगी स्वत:कडे, कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करून, कर्तव्यदक्षता प्रमाण म्हणून कार्य केल्याशिवाय बँक मानांकनात वाढ, कॉलेज ऑफ पोटेन्शिअल एक्सलन्स, शासनाचा उत्कृष्ट संस्था पुरस्कार, संशोधन प्रकल्प अनुदान या गोष्टी लाभत नसतात. त्यांना मिळालेली मुदतवाढ ही संस्थेची शाबासकी आहे. तशी ती डॉ. पाटील यांची कार्यसिद्धीपण, माणूस कार्यपरायण झाल्याशिवाय हे घडत नसते. 'Things get done by the colleagues.' हे प्रशासक कौशल्य जसे आहे, तसे तुमच्या जीवनव्यवहाराची ती

माझे सांगाती/१०९