पान:माझे चिंतन.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८६ माझे चिंतन

वेल्स, स्ट्रीट यांची ही संघराज्य योजनासुद्धा त्याच कोटीतील नाही काय ? ही शंका अगदी खरी आहे. आज जगात दीर्घकाल घडलेली राष्ट्रसुद्धा बिघडतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंड मिळून तीनशे वर्षांपूर्वी ब्रिटन घडले. पण आता स्कॉटिश लोकांना स्वतंत्र व्हावयाचे आहे. फ्रान्सचे अध्यक्ष दि गॉल परवा कॅनडाला गेले होते. तेथे त्यांनी फ्रेंच कॅनडा निराळा व्हावा अशी चिथावणी देण्याचा उपद्व्याप करून ठेवला व काही फ्रेंच कॅनेडियनांनी त्यांना साथही दिली. द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाला भारतातून फुटून निघावयाचे आहे. भारतीय मुस्लीमांनी भारताची फाळणी तर केलीच पण राहिलेल्या भारतातही त्यांना पाकिस्ताने निर्माण करावयाची आहेत. नागा, मिझो यांना स्वतंत्र राज्ये हवी आहेत. अशा स्थितीत अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारखी दीर्घकाल स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अनुभवणारी राष्ट्रे ते निधान सोडून देऊन मोठ्या संघराज्यात विलीन होण्यास सिद्ध होतील ही अपेक्षा बाळगणे हेसुद्धा भ्रांतीचे, स्वप्नाळूपणाचे लक्षण नाही काय ?

आर्थिक हितसंबंधांतून ऐक्य ?

 सकृद्दर्शनी ते तसे आहे हे खरे आहे. पण संघराज्यवादी पक्षाने मांडलेले विचार पाहिल्यावर आपले पाय स्वप्नभूमीतून थोडे तरी जमिनीला लागल्यासारखे वाटतात. आणि दुसऱ्या बाजूने सर्व मानवजातीचा व मानवी संस्कृतीचा अंतकाळ पुढे दिसत असल्यामुळे, युद्धाला सांगितलेला हा पर्याय शक्यतेच्या कोटी येण्याचा बराच संभव आहे असे मानण्यास व त्यासंबंधी चर्चा करण्यास मन तयार होते.
 संघराज्यवादी पक्षाचे म्हणणे असे आहे की या योजनेत आम्ही नवीन असे काही गृहीत धरलेले नाही. लहान लहान जमातींचे लहान लहान परगणे व त्यांची स्वतंत्र राज्ये पूर्वी होती. ती विलीन होऊन त्यांचीच आता राष्ट्रे बनली आहेत. हिंदुस्थान, चीन ही मागल्या काळी बनली; अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, रशिया ही अर्वाचीन काळी बनली. हीच प्रक्रिया पुढे चालवून नवीन संघराज्य घडवावे, इतकेच त्यांचे म्हणणे आहे. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्विट्झरलंड यांची उदाहरणे संघराज्यवादी लोक नेहमी देतात. अमेरिकेचे उदाहरण अतिशय उद्बोधक असे आहे. तेथील तेरा संस्यानांत पोल, स्वीड, फ्रेंच, इंग्लिश असे