पान:माझे चिंतन.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध अटळ आहे काय ? ८७ 

अनेक राष्ट्रीयत्वाचे लोक होते. कॅथॉलिक, प्रोटेस्टंट, बॅप्टिस्ट, क्वेकर असे भिन्न पंथीही त्यांत होते. राजसत्ता, लोकसत्ता, साम्राज्यसत्ता अशा त्यांच्या भिन्न पूर्वपरंपरा होत्या. आणि इंग्लंडशी त्यांची लढाई सुरू झाली तेव्हा त्यांचे परस्पर वैमनस्य इतके विकोपाला गेले होते की, काही संस्थानांनी एकमेकांच्या सरहद्दीवर सैन्यही आणून उभे केले होते. लढाई जिंकल्यानंतरही संघराज्याची कल्पना हवेतच होती. हॅमिल्टन, मॅडिसन, वॉशिंग्टन या संघराज्याच्या पुरस्कर्त्याना आज द्रष्टे म्हणतात. त्यावेळी स्वप्नाळू, भ्रांतिष्ट म्हणून त्यांचा उपहासच प्रथम झाला. रिचर्ड हेन्री ली याने १७७६ साली स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा ठराव मांडला होता. पण त्याचाही संघराज्याला विरोध होता. तरी, अशाही स्थितीत शंभर दिवसांच्या चर्चेनंतर संघराज्याचा ठराव सर्वसंमत झाला व आज त्याची लोकसंख्या व क्षेत्रफळ दशगुणित झाले असूनही त्याचा संसार सुखाने चालला आहे. आस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिया, क्वीन्सलँड, न्यू साऊथ वेल्स इ. संस्थानांचे संघराज्य असेच दीर्घ चर्चेनंतर १९०१ साली अस्तित्वात आले व तेही अद्याप टिकून असून चांगली प्रगती करीत आहे. कॅनडाची फ्रेंच व इंग्लिश कॅनडा अशी फाळणी व्हावी अशी चिथावणी द गॉलने दिली तरी, तेथील जनतेने ती मानली नाही, हे गेल्या महिन्यात तेथे झालेल्या निवडणुकांवरून स्पष्ट दिसते. संघराज्याच्या बाजूनेच बहुसंख्यांनी मते दिली आणि पंतप्रधानपदी त्याच मताचा नेता आला आहे. कॅनडात दोन भाषा राजभाषा म्हणून मान्य आहेत तर स्विट्झरलँडमध्ये तीन भाषांचा संसार आहे. जर्मन, फ्रेंच, इटालियन या तीनही राष्ट्रीयत्वाचे लोक या देशात आहेत. लगतच्या या तीन राष्ट्रांत दर पिढीला एकदा तरी युद्ध होतेच. असे असूनही हे संघराज्य १४९९ पासून साडेचारशे वर्षे सुखाने चालले आहे. भांडवलशाही, धर्मभेद वा वंशभेद तेथे युद्धास कारण झाले नाहीत.
 पण या बाबतीत युरोपीय कॉमन मार्केटचे उदाहरण अत्यंत उद्बोधक आहे. हे कॉमन मार्केट किंवा 'युरोपियन एकॉनॉमिक कम्युनिटी' याचा गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहिला तर हा एक चमत्कार आहे असे वाटू लागते; आणि हा जर सध्याच्या जगात घडणे शक्य झाले तर लोकशाही संघराज्य हा दुसराही चमत्कार घडू शकेल असे वाटते. या कम्युनिटीमध्ये फ्रान्स, इटली, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जम व लक्झेंबर्ग अशी सहा राष्ट्रे प्रारंभापासून सामील झाली आहेत. १९५७ साली रोमच्या करारान्वये ही कम्युनिटी अस्तित्वात आली