पान:माझे चिंतन.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध अटळ आहे काय ? ८५ 

असणार नाहीत. फेडरल न्यायालयाचे निर्णय जसे त्या संस्थानांना मान्य करावे लागतात तसेच या सदस्यांनाही मान्य करावे लागतील. सर्व संघराज्याचे लष्कर एकच राहील, परराष्ट्र धोरणही संघराज्यच ठरवील. सारांश हे संघराज्य आजच्या अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड या राष्ट्रांसारखेच- पण प्रमाणाने फार मोठे, फार विशाल व त्यांच्यापेक्षा फार समर्थ असे- एक राष्ट्रच होईल.
 सध्याच्या इतर राष्ट्रांप्रमाणेच हे एक राष्ट्र होणार असेल तर त्यांना जे शक्य झाले नाही ते याला कसे शक्य होईल, युद्धविराम ते कसा घडवू शकेल, असा प्रश्न येईल. पण त्याचे उत्तर सोपे आहे. या राष्ट्रांचे सामर्थ्य इतके अतुल होईल की, या संघराज्याबाहेर राहिलेल्या राष्ट्राना त्याच्याशी मुकाबला करणे कधीही शक्य होणार नाही. या संघराज्याशी तर ती लढू शकणार नाहीतच पण आपसातही ती लढू शकणार नाहीत. कारण त्या युद्धात हे संघराज्य हस्तक्षेप करून ते सुरू होण्यापूर्वीच थांबवू शकेल. लोकसंख्या, शस्त्रास्त्रे, भौतिक धन, नैसर्गिक संपत्ती ही युद्धाला लागणारी जी साधनसामग्री ती या संघराज्याला इतक्या प्रमाणात उपलब्ध होईल की, शेषजगाच्या असल्या सामग्रीची तिच्याशी तुलनाच होऊ शकणार नाही.
 आणि अंती सामुदायिक दंडशक्तीच्या आधारानेच ही योजना जगात शांतता प्रस्थापित करू पाहते, म्हणूनच ती काहीशी व्यवहार्य कोटीत येते, असे म्हणता येईल. हृदयपरिवर्तनावर ती अवलंबून असती तर तिचा विचार करणे म्हणजे व्यर्थ कालापव्यय ठरला असता. जगात शांततावादी लोकांचा एक पक्ष सनातन काळापासून आहे. सर्व युद्धांना मानवाची युयुत्सुवृत्ती, आक्रमकवृत्ती, हीच कारणीभूत आहे असे त्याचे मत आहे. आणि मानवाचे हृदयपरिवर्तन करून ती वृत्ती नष्ट करणे हा त्याच्या मते शांततेच्या स्थापनेचा उपाय आहे. मानव इतका बदलेल की नाही हा वादग्रस्त प्रश्न आहे; पण त्याचे असे हृदय- परिवर्तन होणे शक्य आहे असे गृहीत धरले तरी त्याला इतका काळ लागेल की, त्याच्या आधीच मानवजातीचा संहार होऊन जाईल. तेव्हा असले उपाय करमणुकीखातर फार तर चर्चेला घेता येतील.
 शांततावादी पक्ष, मार्क्सवाद, समाजवाद यांच्या जागतिक शांततेच्या योजना या अव्यवहार्य, भ्रांत व स्वप्नाळू ठरविल्यानंतर साहजिकच प्रश्न असा येतो की