पान:माझे चिंतन.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८४ माझे चिंतन


लोकायत्त राष्ट्रे - समान संस्कृती

 या संघराज्याचे स्वरूप काय असावे, त्यात कोणकोणत्या राष्ट्रांचा समावेश व्हावा यासंबंधी खूप सविस्तर चर्चा या राजनीतिज्ञांनी केली आहे. ती सर्व येथे देण्याचे कारण नाही. आपल्या विवेचनाला अवश्य तेवढा भावार्थ येथे देतो.
 हे संघराज्य म्हणजे विश्वराष्ट्र किंवा जगद्राज्य नव्हे. विश्वशासनाची कल्पना कितीही रमणीय असली तरी, किंवा ती अत्यंत रमणीय आहे म्हणूनच, ती अव्यवहार्य, अशक्य व स्वप्नरंजनात्मक आहे. आजच्या जगाच्या परिस्थितीत तिचा विचार करण्यात काहीच ताल नाही. मग हे संघराज्य कोणत्या राष्ट्रांचे व्हावयाचे? क्लॅरेन्स स्ट्रीट यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कानडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, स्वीडन, नॉर्वे, स्विट्झरलँड, वेल्जम, डेन्मार्क, आयरलँड, फिनलंड व नेदरलँडस अशा पंधरा राष्ट्रांची एक यादी दिली आहे. याच राष्ट्रांची नावे यादीत घालण्याचे कारण उघड आहे. ही सर्व राष्ट्रे लोकायत्त असून त्यांची संस्कृती बऱ्याच अंशी समरूप आहे. यांतील नावांविषयी मतभेद होणे शक्य आहे. ही दुसऱ्या महायुद्धापूर्वीची यादी आहे. आज पश्चिम जर्मनी, भारत, जपान ही नावे तीत घालावी असे कोणाला वाटेल तर दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्यांच्या वर्णद्वेषी धोरणामुळे ते नाव गाळावे असे कोणी सुचवील. पण आज ज्यांची संस्कृती बऱ्याच अंशी एकरूप आहे, जी लोकायत्त आहेत, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मातीत शासन इ. तत्त्वांवर ज्यांची श्रद्धा आहे: अशी राष्ट्रे निवडल्यास त्यांचे संघराज्य घडविणे व्यवहार्य कोटीत येईल हा त्यातला भावार्थ सर्वमान्य होईल असे वाटते.

एकच सार्वभौम शासन

 या राष्ट्रांचे संघराज्य घडवावयाचे याचा स्पष्ट अर्थ असा की, या सर्वांचे मिळून एकच सार्वभौम शासन राहील. सदस्य राष्ट्रांना आपले स्वतंत्र सार्वभौमत्व या शासनात विलीन करावे लागेल. असे झाले तरच हे संघराज्य जगातली युद्धे थांबवून जागतिक शांतता प्रस्थापू शकेल. म्हणून हे कलम अनिवार्य आहे. त्याविषयी ढिलेपणा किंवा तडजोड ही अशक्य आहे. न्यूयॉर्क, पेनसिल्व्हानिया, टेक्सास या अमेरिकन संघराज्यातील संस्थानांप्रमाणे या संघराज्यातील राष्ट्रांना अंतर्गत स्वायत्तता सर्व प्रकारची मिळेल. पण त्यांना सार्वभौम हक्क कसलेही