पान:माझे चिंतन.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध अटळ आहे काय ? ८३ 

तसेच आहे. पण ती संस्थाने युद्धास प्रवृत्त होत नाहीत. याचे कारण काय ? याचे कारण एकच. ती स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे नाहीत. त्यांच्याजवळ स्वतंत्र लष्कर नाही. त्यांचे परराष्ट्र धोरण केन्द्रनिरपेक्षपणे त्यांना ठरविता येत नाही. रशियातील युक्रेन लिथुआनिया, जॉर्जिया यांच्यातील वैराग्नी हा जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन यांच्यांतील युद्धकालीन वैराग्नीपेक्षा प्रखरतेत मुळीच कमी नाही. १९१७ च्या क्रान्तीनंतर सोव्हिएट नेत्यांनी प्रथम स्वयंनिर्णयाचे तत्त्व घोषित करून फुटून निघण्याचा हक्क सर्वाना देऊ केला. त्यावरोवर युनियन ऑफ दि सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिक्समधील अनेक प्रदेशांत फुटून निघण्याची चळवळ सुरू झाली. पण स्टॅलिनने यमदंड फेकून ती नाहीशी केली. अशी अंतर्गत वैरे असूनही त्या प्रदेशांना सार्वभौम सत्ता नसल्यामुळे ते युद्धाला प्रवृत्त होत नाहीत- होऊ शकत नाहीत. हाच धागा पुढे नेऊन संघराज्याचे पुरस्कर्ते म्हणतात, आजच्या जर्मनी, इटली, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका इ. राष्ट्रांचे संघराज्य प्रस्थापित केले तर तीही परस्परांत युद्दे करू शकणार नाहीत.
 पहिल्या महायुद्धानंतर प्रस्थापित झालेली 'लीग ऑफ नेशन्स' ही संस्था व दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेली 'युनायटेड नेशन्स' ही संस्था या दोन्ही संस्थांचे स्वरूप संघराज्याचे नाही. राज्यसंघाचे आहे. म्हणजे लीग किंवा यूनो यांच्या सदस्य राष्ट्रांचे सार्वभौमत्व कोणत्याही दृष्टीने बाधित वा मर्यादित झालेले नव्हते व नाही. त्यांच्या अपयशाचे मुख्य कारण हे आहे. यूनोमध्ये झालेला कोणताही ठराव तिच्या सदस्यांवर बंधनकारक नाही. अमेरिका, इंग्लंड, रशिया यांसारखे कोणतेही बडे राष्ट्र आपल्या एकट्याच्या नकाराने तो सर्व ठराव रद्द करू शकते. शिवाय या प्रत्येक राष्ट्रापाशी आपापले खडे लष्कर आहे. आणि यूनोनाशी तसे स्वतंत्र लष्कर नाही. त्यामुळे यूनो हा राष्ट्रसंघ किंवा राज्यसंघ म्हणजे एक सदिच्छासंघ झाला आहे. युद्धे थांबविण्यात त्याला यश येत नाही ते यामुळेच. उलट अमेरिका हे संघराज्य आहे. त्याच्या सदस्यांजवळ स्वतंत्र लष्कर नाही. त्यांना सार्वभौम अधिकार नाहीत. म्हणून युद्ध टाळणे त्या संघराज्याला शक्य होते. राज्यसंघ व संघराज्य यांतील फरक हा असा आहे. म्हणून यूनो- सारख्या राज्यसंघांचा काही उपयोग होणार नाही, युद्धविराम हवा असेल तर संघराज्यच स्थापिले पाहिजे, असा या पंडितांचा आग्रह आहे.