पान:माझे चिंतन.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ८२ माझे चिंतन

विचारवंतांनी सांगितलेला आहे. त्याचा आपण विचार केला पाहिजे. लीग ऑफ नेशन्स, यूनो यांहून हा उपाय निराळा आहे. लीग हा राष्ट्रसंघ होय. यूनोचेही तेच रूप आहे. पण या पंडितांना असा राष्ट्रसंघ किंवा राज्यसंघ अभिप्रेत नसून, संघराज्य अभिप्रेत आहे. त्याला ते फेडरेशन म्हणतात. लीगला अपयश येणे त्यांच्या मते अपरिहार्यच होते. पण फेडरेशन अपयशी ठरणार नाही असे त्यांचे मत आहे. लीग आणि फेडरेशन, राज्यसंघ आणि संघराज्य यांत ते कोणता फरक करतात ? तेच आता पाहावयाचे आहे. आणि ते पाहताना त्यांची एकंदर विचारसरणी समजून घ्यावयाची आहे.

राज्यसंघ नव्हे संघराज्य !

 क्लॅरेन्स के स्ट्रीट या पंडिताने 'युनियन नाऊ' या आपल्या प्रबंधात संघराज्याची ही कल्पना प्रथम व्यवहार्य रूपात मांडली. त्यानंतर १९३९ साली डब्ल्यू. बी. करी या लेखकाने 'दि केस फॉर फेडरल युनियन' या आपल्या पुस्तकात बर्ट्रांड रसेल, एच्. जी. वेल्स यांसारख्या थोर पंडितांच्या आधारे त्याच कल्पनेचा विस्तार केला. त्यानंतरच्या तीस वर्षांच्या काळात अनेक पंडितांनी निरनिराळ्या स्वरूपांत हा विचार पुनःपुन्हा मांडलेला दिसतो. या सर्वांच्या आधारानेच 'संघराज्य' या कलनेचे विवेचन पुढे केले आहे.
 भिन्नभिन्न स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे व त्यांच्या बुडाशी असलेली राष्ट्रभावना हेच युद्धाचे आजच्या जगातले प्रधान कारण आहे, असे या सर्व विचारवंतांचे मत आहे. ते म्हणतात, अमेरिका, रशिया, चीन, हिंदुस्थान यांसारख्या खंडप्राय विशाल देशांच्या अभ्यंतरात फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, इटली यांच्या आकाराची अनेक राष्ट्रे नांदत आहेत. अमेरिकेत ४०/५० संस्थाने आहेत आणि त्यांतील बरीच वरील देशांएवढी आहेत. रशियात युक्रेन, जॉर्जिया, सैबेरिया, अझरबैदान असे अनेक राष्ट्रसम प्रदेश आहेत. हिंदुस्थान, चीन हे देश असेच अनेक राष्ट्रे मिळून झालेले आहेत. असे असताना त्या राष्ट्रांची आपसांत युद्धे का होत नाहीत ? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, बंगाल, बिहार, ओरिसा या प्रदेशांचे हितसंबंध एकरूप मुळीच नाहीत. काही प्रदेशांतील कलह अतिशय विकोपाला गेले आहेत. पण त्यांच्यांत युद्धे होत नाहीत. निग्रोंच्या प्रश्नावरून अमेरिकेतील अनेक संस्थानांत परस्परांत फार कडवट वैर निर्माण झाले होते व ते अजूनही