पान:माझे चिंतन.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध अटळ आहे काय ? ८१ 

इजिप्तचे इस्रायलवरील आक्रमण, पाकिस्तानात हिंदूंच्या व ख्रिश्चनांच्याही होणाऱ्या कत्तली यांवरून सष्ट दिसते. तेव्हा ते युद्धकारण दुर्लक्षिण्याजोगे आहे असे म्हणता येणार नाही.

राष्ट्रभेद

 भिन्नभिन्न राष्ट्रांची आपल्या स्वतंत्र सार्वभौमत्वाबद्दलची भक्ती काही कमी झालेली आहे काय ? तशी मुळीच चिन्हे दिसत नाहीत. कम्युनिझमचा प्रसार सर्व जगात करावयाचा, सर्व जगातील कामगारांची संघटना करावयाची आणि जागतिक कामगार सत्ता स्थापून राष्ट्रभेद, धर्मभेद, वंशभेद इ. कारणे समूळ नष्ट करून सर्वत्र शांतता प्रस्थापित करावयाची अशी प्रतिज्ञा करून ज्या देशांनी नव्या युगाच्या घोषणा केल्या त्यांनीच कडव्या, आक्रमक व लुटारू राष्ट्रवादाचा अंगीकार केल्यानंतर सार्वभौमत्वाची स्पृहा ओसरू लागली आहे, असे कसे म्हणता येईल ? तेव्हा राष्ट्रभेद हे सर्वांत प्रभावी असलेले युद्धकारण कोणत्याही अर्थाने कमजोर झालेले नाही हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.
 युद्धे होण्याची कारणे कोणती याचा शोध घेऊन ती कारणे आज कितपत प्रभावी आहेत, युद्धे पेटवून देण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी अजूनही आहे काय, याचा आपण विचार केला. ती कारणे आजही तितकीच, क्वचित जास्तही प्रभावी आहेत असे आपल्या ध्यानात आले. असे जर आहे तर या विवेचनाचा एकच अपरिहार्य निष्कर्ष असू शकतो - युद्ध अटळ आहे !! त्यामुळे येथे चर्चा थांबवावयास हवी. पण जगातल्या राजकीय तत्त्ववेत्त्यांनी अशाही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. त्यांचा विचार केल्यावाचून या विवेचनाला पूर्णता येणार नाही. लीग ऑफ नेशन्स, यूनो या संस्था स्थापून युद्धकारणे नष्ट करण्याचा जगातील राजकीय पुढाऱ्यांनी महाप्रयत्न चालविला आहे. त्यांना यश आलेले नाही हे खरे. पण नव्या उपयांचे चिंतन करताना त्या अपयशाचीही चिकित्सा केली पाहिजे. म्हणून प्रारंभीच्या विवेचनाचा अपरिहार्य निष्कर्ष समोर दिसत असूनही आणखी वाद करून काही तत्त्वबोध होतो काय ते पाहू.
 जगातल्या बलाढ्य लोकशाही राष्ट्रांचे संघराज्य हा युद्धे टाळण्याचा एक उपाय म्हणून नॉर्मल एंजल, क्लॅरेन्स के स्ट्रीट, एच. जी. वेल्स अशा काही