पान:माझे चिंतन.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युद्ध अटळ आहे काय ? ७९ 

सालीच जाहीर करून टाकले. तेव्हा आज सोव्हिएट रशिया कोणाशी वैर धरीत असेल तर ते राष्ट्रनिष्ठेमुळेच होय. भांडवलशाहीचा त्या वैराशी काही संबंध नाही.

साम्यवादी राष्ट्रांची शासकीय भांडवलशाही

 भांडवलशाही, वंशभेद, धर्मभेद व राष्ट्रीयभावना ही युद्धाची चार कारणे होत. आजपर्यंतची सर्व युद्धे बव्हंशी याच कारणामुळे झालेली आहेत. आता जगातून युद्धे नाहीशी व्हावयाची असतील तर ही कारणे नष्ट झाली पाहिजेत हे उघड आहे. तेव्हा यांपैकी कोणती कारणे आज नष्ट झाली आहेत व कोणती नजीकच्या भविष्यकाळात नष्ट होण्याचा संभव आहे हे प्रथम पाहिले पाहिजे.
 भांडवलशाही जगातून नष्ट झाली आहे काय ? इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स ही खरी मूळची भांडवलशाही राष्ट्रे. पण ती आता तशी राहिलेली नाहीत. त्यांच्या देशांत पूर्वीप्रमाणे गरिबांचे शोषण आता राहिलेले नाही. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, शिक्षण व औषधोपचार हे सर्व कायद्याने मिळते. तेथे विषमता असली तरी ती पूर्वीइतकी तीव्र नाही आणि प्रत्येक नागरिकाच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर राहिलेली विषमता लोकांना युद्धोन्मुख करणे शक्य नाही. यामुळेच या भांडवली देशांनी आपापली साम्राज्ये विसर्जित केलेली आहेत. तेव्हा त्या दृष्टीने पाहता युद्धाचे मूळच नाहीसे झाले आहे. पण या देशांतून भांडवलशाही व साम्राज्यशाही नष्ट झाली असली तरी सोव्हिएट रशिया, चीन या देशांत ती नव्याने अवतरली आहे हे स्पष्ट दिसत आहे. हंगेरी, पोलंड, बल्गेरिया, लॅटव्हिया, लिथुआनिया इ. पूर्व युरोपीय देश दुसऱ्या महायुद्धात रशियाने गिळंकृत केले व तेथील लोकांनी स्वातंत्र्याची चळवळ करताच अमानुष क्रौर्याने ती त्याने दडपून टाकली. सोव्हिएट रशियाने स्वतःच्या देशात गरिबांचे, कामगारांचे, शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण चालविले आहे हे सर्वत्र महशूर आहे. राष्ट्रपतीपासून सुतारलोहारापर्यंत सर्वांना सारखा पगार मिळावयाचा असे रशियात कधीच घडले नाही. प्रारंभी तशा घोषणा करण्याची चाल होती. पण पुढे स्टॅलिनने कायदे करूनच विषमता निर्माण केली. हे होणे अपरिहार्यच होते असे जिलास याने 'न्यू क्लास' या आपल्या पुस्तकात दिले आहे. तेव्हा शोषण, साम्राज्यवाद, वसाहतवाद या सर्व अर्थांनी सोव्हिएट रशिया हा भांडवलशाही देश आहे यात वाद नाही. चीनमध्येही भांडवलशाहीची सर्व लक्षणे रशियाप्रमाणेच स्वच्छ