पान:माझे चिंतन.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ७८ माझे चिंतन

टाकण्याची नासरने प्रतिज्ञा केली आहे. कॅथालिकांना भारतात शिरून अखिल हिंदूंना ख्रिस्ती करून टाकावयाचे आहे. युकॅरिस्ट काँग्रेसच्या वेळी तिच्या प्रवर्तकांनी या जाहीर घोषणा केलेल्या आहेत. अनेक मुस्लीम नेत्यांनी हिंदूंविषयी हेच धोरण जाहीरपणे सांगितलेले आहे. एकाच धर्मीयांचे जग झाले पाहिजे, भिन्न धर्मीयांचे सहजीवन शक्य नाही, असाच या वृत्तीचा अर्थ आहे. युद्धे यातूनच उद्भवतात. भारतीयांना ते कळावयाचे नाही हे निराळे. पण न कळणे हीच त्यांची प्रकृती असून कळणे ही त्यांच्या जीवनातील विकृती- अपवाद आहे.

राष्ट्रभेद

 राष्ट्रभेद हे युद्धाचे कारण आहे हे तर अगदी महशूर आहे. आज तर भिन्न सार्वभौम राष्ट्रे असणे हे युद्धाचे एकमेव कारण आहे असे अनेक पंडित मानतात. राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती हा त्यांच्या मते जगाला जडलेला एक मोठा रोग आहे. त्यातून जग मुक्त झाल्यावाचून युद्धे टळणार नाहीत असे ते निःसंदेहपणे सांगतात. नॉर्मल एंजल हे या पंथाचे प्रमुख प्रवक्ते आहेत. मार्क्सवादी लोकांना हे राष्ट्रभेदाचे कारण मान्य नाही. या राष्ट्रभक्तीच्या मागे भांडवली स्वार्थच दडलेला असतो, असे ते म्हणतात. पण हे नॉर्मन एंजल प्रभृतींना मान्य नाही. भिन्न राष्ट्रीय सार्वभौमत्व हेच त्यांच्या मते युद्धाचे आजचे कारण आहे. अमेरिकेतील न्यूजर्सी, पेनसिल्व्हानिया, ॲरिझोना ही संस्थाने भांडवलशाहीनेच व्याप्त आहेत; पण त्यांच्यांत युद्धे होत नाहीत; कारण त्या स्वतंत्र सार्वभौम सत्ता नाहीत. उलट युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इटली ही राष्ट्रे आकारांनी या अमेरिकन संस्थानांएवढीच असून त्यांच्यात दर वीस पंचवीस वर्षांनी युद्ध होतेच. याचे कारण हेच की ती राष्ट्र सार्वभौम आहेत. तेव्हा भांडवलशाहीवर काही अवलंबून नाही आणि भांडवलशाही हे युद्धाचे एकमेव कारण असे म्हणणाऱ्या मार्क्सच्या अनुयायांनीच त्याचे वचन खोटे पाडून दाखविले आहे. आज सोव्हिएट रशिया नवचीन, युगोस्लाव्हिया या देशांतील भांडवलशाही तेथील सत्ताधाऱ्यांच्या मते नष्ट झालेली आहे. तरी त्यांच्यांत अहिनकुल वैर निर्माण झाले आहे. तेव्हा तेथेही राष्ट्रभेद हेच युद्वाचे, वैराचे प्रभावी कारण आहे. कम्युनिझम हे मूलतः जगद्राष्ट्रवाद सांगणारे तत्त्वज्ञान आहे. राष्ट्रीय कम्युनिझम असूच शकत नाही. पण 'आमचा कम्युनिझम एकराष्ट्रमर्यादित आहे' असे स्टॅलिनने १९२६