पान:माझे चिंतन.pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरुषांच्या तुलनेला येतील असे अनेक पुरुष ही भूमी निर्माण करू शकते. पण हे थोर पुरुष संघटित कार्य करू शकत नाहीत. यामुळे आपली सर्व गुणसंपदा वाया जात आहे, असा या निबंधाचा भावार्थ आहे. क्रिकेटमध्ये विक्रमी वीर आपल्याकडे आहेत पण संघभावना नाही. म्हणून जगात कोणत्याच कसोटी सामन्यात आपल्याला जय मिळत नाही. उलट संघभावना प्रबळ असल्यामुळे, हॉकीमध्ये आपण अजिंक्य ठरतो. असा तेव्हा इतिहास दिसत असल्यामुळे हे दोन खेळ प्रतीक म्हणून मी निवडले होते.
 हा लेख १९५३ साली लिहिला आहे. त्यानंतरच्या पंधरा एक वर्षांत जरा उलटापालट झाली आहे असे दिसते. १९६४ सालानंतर हॉकीमधले आपले अजिंक्यपद गेले आणि क्रिकेटमध्ये इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाशी सामना देऊन १९६२ साली आपण भारतात झालेल्या कसोटी सामन्यात अजिंक्यपद मिळविले. न्यूझीलंड संघाविरुद्धही आपण दोन- तीनदा अजिंक्यपद मिळविले आहे. तज्ज्ञांच्या मते हे विजय संघभावनेचे आहेत. तेव्हा मनात येते की हीच भावना आणखी प्रबळ झाली तर वेस्ट इंडीज, आस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांत जाऊन तेथील कसोटी सामन्यातही आपण अजिंक्यपद मिळविण्याचा संभव आहे. या संग्रहाची दुसरी आवृत्ती १९७० साली प्रसिद्ध झाली. आता ही तिसरी आवृत्ती १९७३ साली प्रसिद्ध होत आहे. त्या दरम्यान असे प्रत्यक्ष घडलेच आहे. १९७१ साली इंग्लंडमध्ये व १९७२ साली भारतात आपण इंग्लिश क्रिकेट संघावर विजय मिळविला आहे. आणि क्रिकेट हा खेळ खरोखरच आपल्या जीवनाचे प्रतिबिंब दाखवीत असला तर जीवनाच्या इतर क्षेत्रांतही आपण सामूहिक कार्य करण्याची विद्या हस्तगत करण्यातही कदाचित यशस्वी होऊ !
 ' समृद्धीचा शाप ' ही व्यथा अतिशय दुःखदायी आहे. जगात आज अनेक देशांत बहुसंख्य लोकांना पुरेसे अन्नवस्त्रही मिळत नाही. अतिशय भीषण दारिद्रयात निम्म्या पाऊण जगाला राहावे लागते. या दारिद्र्यामुळे मनुष्य साहजिकच गुन्हेगारीस प्रवृत्त होतो. अशा स्थितीत विज्ञानामुळे, नवीन उत्पादनसाधनांमुळे, यंत्रविद्येमुळे सर्वांना पुरेसे अन्न, वस्त्र, घर,