पान:माझे चिंतन.pdf/१०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षण, आरोग्य हे देता आले की समाज सुखी होईल, गुन्हेगारी नष्ट होईल व मानवसमाज संस्कृतीच्या वरच्या पायरीवर जाईल असे समाजशास्त्रवेत्ते म्हणत असत. पण प्रत्यक्षात झाले आहे ते अगदी उलटेच. पाश्चात्त्य देशांत आणि विशेषतः अमेरिकेत सर्व प्रकारची समृद्धी आली आहे. आपल्या तुलनेने पाहता तेथे नंदनवनच आहे. पण आश्चर्याची व खेदाची गोष्ट अशी की तेथे गुन्हेगारी, अनाचार, स्वैराचार, गुंडगिरी मवालीपणा, पेंढारशाही यांना खळ तर पडत नाहीच, तर उलट समृद्धीच्या प्रमाणात हे सामाजिक रोगही वाढतच आहेत. ' समृद्धीचा शाप ' या निबंधात याची कारणमीमांसा केली आहे.
 ' विश्वाविरुद्ध ', ' आमची फौजदारनिष्ठा ' व ' चौथ्या दशांशाची दक्षता ' या निबंधांत भारतीयांच्या अंगच्या तीन फार मोठ्या वैगुण्यांचा विचार केला आहे.
 प्रत्येक समाजात धार्मिक, सामाजिक संस्था, रूढी, नियम यांना कालांतराने जडपणा येतो. त्यांची उपयुक्तता नाहीशी होते. व त्यांत परिवर्तन होणे अवश्य असते. पण अशा संस्थांवर समाजाचे फार प्रेम असते, श्रद्धा असते. त्यामुळे त्या बदलण्यास तो तयार होत नाही. अशा वेळी कोणीतरी समाजसुधारकाने धैर्याने परिवर्तनाचे, क्रांतीचे तत्त्वज्ञान सांगणे व त्यांचा आचार करणे अवश्य असते. समाज अर्थातच अशा समाजसुधारकावर अत्यंत संतापतो, त्याला धर्मद्रोही, समाजद्रोही ठरवून जबर शिक्षा करतो, पुष्कळ वेळा मृत्युदंडही देतो. तरीही सर्व समाजाविरुद्ध जाऊन, देहदंडाची भीती न बाळगता, धैर्याने समाजाला नवे तत्त्व, नवे विचार सांगणे अवश्य असते. नाहीतर कालबाह्य झालेल्या संस्था, घातक रूढी यामुळे समाजाचा ऱ्हास होतो. पण अशा प्रकारे सर्व समाजाविरुद्ध केवळ तत्त्वासाठी एकट्याने उभे राहण्याचे, प्रसंगी त्यासाठी आत्मबलिदान करण्याचे धैर्य अंगी असणारे पुरुष भारताच्या दीर्घ इतिहासात केव्हाच झाले नाहीत. युरोपात सॉक्रेटीस हा तसा पहिला धीर पुरुष झाला आणि पुढे रॉजर वेकन, वायक्लिफ, जॉन हस, मार्टिन लूथर असे अनेक धीर पुरुष पश्चिमेला लाभले आणि त्यांनी मोठी परंपराच निर्माण केली. हिंदुस्थानात आगरकर हे असे समाजसुधारक