पान:माझे चिंतन.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हजार वर्षांच्या काळात तर ती अपवादालाही नव्हती. गेल्या शंभर वर्षात भारतात ग्रंथलेखन होऊ लागले आहे. पण ज्या मानाने समाजाला गरज आहे त्या मानाने ते फार अपुरे आहे. ही आपल्या समाजातील उणीव ' सरस्वतीची हेळसांड ' व ' ग्रंथसत्ता ' या दोन लेखांत मी मांडली आहे. पहिल्या लेखात ब्रिटिशपूर्व काळात वरील विषयांवर ग्रंथ न लिहिले गेल्यामुळे केवढी हानी झाली आहे ते सांगितले आहे. दुसऱ्या लेखात समाजावर प्रत्यक्षात राजा, दण्डशहा किंवा लोकसभा यांची सत्ता असली तरी खरी सत्ता ग्रंथांचीच असते हा सिद्धान्त विशद केला असून गेल्या शंभर वर्षांत कोणत्या ग्रंथांनी कशी सत्ता महाराष्ट्रावर व भारतावर प्रस्थापित केली आहे ते मराठी साहित्याचा मागोवा घेऊन सांगितले आहे. ग्रंथ हे समाजपरिवर्तनाचे मोठे साधन असल्यामुळे तरुण कार्यकर्त्यांनी ते साधन हस्तगत करून घ्यावे हे सांगण्याचा यात हेतू आहे.
 अध्यात्मज्ञान, भक्ती, नीती, समाजरक्षण, संवर्धन हा धर्माचा खरा गाभा होय. पण तो दुर्लक्षून टिळेटोपीमाळा हे जे कर्मकांड त्यालाच आपण खरा धर्म मानतो. साधुसंतांनी या कर्मकांडावर टीका करून भक्तीचे माहात्म्य वर्णिले हे खरे; पण तरीही भारतीय जीवनात कर्मकांडाचेच महत्त्व जास्त मानले गेले आणि मानले जात आहे. आपण 'नरोटीची उपासना' करतो याचा हा अर्थ आहे. या निबंधात धार्मिक दृष्टीने प्रथम याचा विचार करून नंतर सध्या शिक्षण, नियोजन या सर्वच क्षेत्रांत आपला कारभार कर्मकांडात्मक कसा झाला आहे ते त्या त्या क्षेत्रांतील उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. एकापरीने हा विषय जुनाच आहे. पण आजच्या काळांच्या संदर्भात व आजच्या जीवनातील उदाहरणे देऊन तो मांडलेला असल्यामुळे मानवी मनाच्या त्या दोषांमुळे सध्या आपल्या प्रगतीला कशी खीळ बसत आहे ते ध्यानात येईल.
 'भारतीय जीवनातील क्रिकेट व हॉकी' या निबंधाच्या नावावरून विषयाची काही कल्पना येणार नाही. हे दोन खेळ आपल्या जीवनाची दोन प्रतीके म्हणून घेऊन, संघटित जीवन, सामूहिक कार्यशक्ती यांचा आपल्या समाजातील अभाव या आपल्या महान दोषाचे विवेचन या लेखात केले आहे. व्यक्ती, व्यक्ती या दृष्टीने पाहता जगातील थोर